शिवसेना-भाजप युती ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी; राणेंचा संताप

66

शिवसेना-भाजपची युती ही केवळ औपचारिकता आहे. ही युती महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नसून मातोश्रीच्या स्वार्थासाठी आहे. मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार पचवण्यासाठी ही युती आहे,’ असा घणाघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

गेली साडेचार वर्षे एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपनं काल आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळं शिवसेनेचे कडवे विरोधक असलेल्या, मात्र भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या नारायण राणे यांनी गोची झाल्याची चर्चा होती. नारायण राणे आता काय करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची पुढील भूमिका स्पष्ट केली.महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. युतीच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली. ‘शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत. शिवसेनेनं दिलेली वागणूक व केलेली टीका भाजपचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत. युतीच्या घोषणेमुळं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठंही उत्साह दिसला नाही. घोषणा झाल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. ही युती केवळ नेत्यांच्या समाधानासाठी आहे. दोन्ही पक्षांना याचा काहीही फायदा होणार नाही,’ असंही त्यांनी सांगितलं.