इंद्रायणी नदी पात्रात उगवलेल्या जलपर्णीवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
वारकरी संप्रदायातील इंद्रायणी नदीचे पावित्र्य अबाधित राखण्या संदर्भात तातडीने परिणामकारक उपाययोजना करण्याची पिं. चिं. मनपा आयुक्तांकडे केली मागणी.
महापालिका उपायुक्तांकडे विविध मागण्यांसाठी निवेदन सादर.
महापालिकेत यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर वंचितचा ठिय्या.
✒ पुणे जिल्हा प्रतीनिधी✒
पिंपरी चिंचवड:- इंद्रायणी नदी पात्रात उगवलेल्या जलपर्णी मुळे इंद्रायणी नदीचा संपुर्ण जलप्रवाह झाकला गेला असुन विविध समस्या उद्भवल्या आहेत. या सर्व समस्यांच्या संदर्भात गुरुवार दिनांक 18 मार्च 2021रोजी सकाळी 11:00 वाजता वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे व महिला आघाडी अध्यक्षा लताताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. सर्वजीत बनसोडे यांच्या प्रमुख उपस्तिथीत मोशी टोल नाक्या नजीक इंद्रायणी नदी घाटाची पाहणी केली.
पाहणी नंतर दुपारी इंद्रायणी नदी पात्राच्या दुर्दशेबद्दल पिं. चिं. मनपा आयुक्त यांना अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर काही वेळ ठिय्या देत घोषणा दिल्या नंतर पिं. चिं. मनपा उपायुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वारकरी संप्रदायात इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण महत्व असुन ही नदी संत परंपरेतील ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे..जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथा बुडवल्याची घटना असो किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्वपुर्ण घटना असो या साऱ्यांची साक्षीदार म्हणजे इंद्रायणी नदीचा प्रवाह याच नदीच्या काठावर अवघ्या 8 ते 10 किलोमिटर अंतराच्या फरकावर एकीकडे संत तुकाराम महाराज तीर्थक्षेत्र तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज आजीवन समाधी स्थळ आळंदी देवाची वसलेले आहे.. वारकरी संप्रदायात या दोन्ही तिर्थक्षेत्रांना अत्यंत पवित्र स्थान असुन या पाठोपाठ इंद्रायणी नदीला देखील अनन्य साधारण महत्व आहे.. ठराविक व विशिष्ट दिवशी भाविक या दोन्ही क्षेत्रांना लाखोंच्या संख्येने भेट देतात व पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून या नदीचे तीर्थ प्राशन करतात.असे असताना मागच्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असुन या वाढलेल्या जलपर्णी नदीचा मुख्य प्रवाह देखील दिसेनासा झाला आहे..वाढलेल्या या जलपर्णी मुळे नदीचे पाणी काळे पडले असुन त्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन या नदी पात्रात असणाऱ्या जलचरांच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण झाला आहे.. मागच्या काही दिवसांमध्ये नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर पांढरा फेस मोठ्या प्रमाणावर तरंगताना आढळला होता एकंदर या नदीच्या दोन्ही बाजुला पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणावर असुन ओढ्यांच्या माध्यमातुन दुषित असे रासायनिक द्रव्य कुठलीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सोडले जात आहे त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे..विशेष म्हणजे आळंदीकर व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडुन या नदीतूनच होत असून आजघडीला इंद्रायणी नदीची दुरावस्था पहाता नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात आहे दुर्दैवाची बाब म्हणजे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडुन इंद्रायणी नदीच्या नावाचा वापर करून “इंद्रायणी थडी” सारख्या हायटेक जत्रा भरवल्या जातात परंतु इंद्रायणी नदीचे ऐतिहासिक स्थान, महत्व व पावित्र्य याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे…असे नमुद करीत
1) वारकरी संप्रदायातील इंद्रायणी नदीचे पावित्र्य अबाधित राखण्या संदर्भात आपण तातडीने परिणामकारक उपाययोजना करावी.
2) इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी त्वरित काढण्यात यावी.
3) औद्योगिक कारखान्यांमधून निघणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे मुळे होणारे नदीचे प्रदूषण त्वरित थांबवावे.
4) या नदी प्रवाहाच्या काठावर असणारे देहू संतपीठ(तीर्थक्षेत्र)ते आळंदी संतपीठ(तीर्थक्षेत्र) या दोघांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रवाहात जल दिंडी मार्ग विकसित करून नदिचे सुशोभिकरणं करण्या संदर्भात त्वरित उपाययोजना करावी व देहू ते आळंदी हा जलमार्ग विकसित करावा.
आशा चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या
मागण्यांसंदर्भात त्वरित कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी, पिंपरी चिंचवड शहर या संदर्भात “इंद्रायणी बचाव” असे आक्रमक आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला आघाडी अध्यक्षा लताताई रोकडे, महासचिव राजन नायर, कार्याध्यक्ष संजीवन कांबळे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, किरण हिंगणे, संघटक बाबुराव फुलमाळी, गुलाब पानपाटील, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड, राहुल इनकर, महिला आघाडी महासचिव गौरी शेलार, शारदा बनसोडे, बशीरा शेख, उषा वाघमारे, राहुल बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.