ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्य बंद
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : शिधापत्रिकेवर धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभबंद होणार आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाने ‘मेरा ई केवायसी’ हे मोबाइल अँप विकसित केले आहे. हे अँप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. त्यामुळे मोबाइलवरून घरबसल्या स्वतःची आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची ई-केवायसी पूर्ण करता येणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी दिली. शिधापत्रिकेवर धान्याचा लाभघेत असलेल्या प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मागील सहा महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत आहे. मात्र, गडचिरोली तालुक्यात अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही. ही ई-केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. या कालावधीत शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी न केल्यास त्यांची नावे शिधापत्रिकेवरून ऑनलाइन वगळली जाणार आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी केले आहे