मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करावा. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

नवी मुंबई येथील कोकण भवन मधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी-बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) या एकूण २१ कि.मी. भागाचे दुपदरीकरण करुन उन्नतीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करणे, आणि हे काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या.

चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पूल (१२५० मी.) हे प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उड्डाणपूलांची कामेही मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजूर करुन घेऊन चालू आर्थिक वर्षात पुढील कामे सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ रस्ता ००.०० ते २२.२०० चे महामार्ग दर्जाच्या स्तराला उन्नतीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी चे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीचे काम मंजूर असून उर्वरित १४.३० कि.मी. चे उन्नतीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी या बैठकी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here