स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याचा धोक्याचा इशारा
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
स्कायमेट या खाजगी संस्थेनंतर आता भारतीय हवामान खात्यानेही यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. देशात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. जून ते सप्टेंबर या महिन्यात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता या दोन्ही संस्थेने वर्तवला आहे.
अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशात कमी पाऊस पडेल असाही अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया व भारताच्या काही भागात दुष्काळ पडण्याची भीतीही या अंदाजात वर्तवण्यात आली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे याचाच अर्थ ८७ सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात हवामानाचा अंदाज खूप महत्वाचा ठरतो. भारतातील शेती पावसावर अलवलंबून असल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात.
शेतीचं देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान १४ टक्के असते, तरी देशातील ७० टक्के रोजगार हे शेतीवर अवलंबून आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पाऊस पडणार असला तरी पावसाचे आगमन वेळीच होणेही तितकेच महत्वाचे आहे. जर पावसाचे आगमन लांबले तर बळीराजाने केलेली पेरणी वाया जाते. पेरणी वाया गेली तर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. शिवाय परतीचा पाऊसही महत्वाचा आहे. परतीचा पाऊस धुमाकूळ घालतो त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते असेच चित्र आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहोत. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आणि त्यात जर पावसाचे आगमन लांबले किंवा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला तर हे वर्ष बळीराजासाठी जिकरीचे ठरू शकते. आधीच अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेला बळीराजा स्कायमेट आणि हवामान खात्याच्या या अंदाजामुळे आणखी निराश झाला आहे. यंदा पुरेसा पाऊस झाला नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजासाठी हा मोठा धक्का असेल.
स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला, तर देशाची अर्थव्यवस्थाच कोलमेडल. पाऊस कमी झाला तर महागाई वाढेल. शिवाय पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. यावर्षी देशाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल असा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम जलसाठ्यावर होणार आहे. उष्णतेप्रमाणेच कमी पावसाचा अंदाज जर खरा ठरला देशात पुन्हा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. चार पाच वर्षांपूर्वी आपण दुष्काळाची दाहकता अनुभवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरावे लागत होते. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती ती स्थिती पुन्हा उदभवू द्यायची नसेल तर प्रशासनाने पाणी वाटपाचे आत्तापासूनच योग्य नियोजन करायला हवे. लोकांनीही त्याला साथ द्यायला हवी. पाणी वाया न घालवता पाणी बचत करून संभाव्य पाणीटंचाईला तोंड देता येऊ शकेल. एकूणच कमी पावसाचा स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याचा अंदाज भारतासाठी धोक्याचा इशारा आहे.