अधिकारी वर्ग यांचे लक्ष फक्त निवडणुकीतच का ?.. कर्जत तालुक्यात जंगलतोड आणि जमीन सपाटीकरण जोरात!
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
कर्जत:-देशात लोकसभा निवडणुका सुरू असून देशातील प्रत्येक तालुक्यातील अधिकारी निवडणुकीचे कामात व्यस्त आहेत. कर्जत तालुक्यातील अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले असून त्याचा फायदा तालुक्यातील अनधिकृत कामे करण्यासाठी उचललत आहेत. या दरम्यान, तालुक्यातील बहुतेक सर्व भागात जमिनी सपाटीकरण करणे व जंगलतोड आणि नद्यातील वाळू काढण्यासाठी नद्या पोखरला जात असून ही सर्व कामे जोरात आणि बिनदिक्कत पणे सुरू आहेत. याबद्दल सर्वसामान्य जनता आवाज उठवत असताना प्रशासन डोळेझाक करीत असल्याने तालुक्यातील आम जनता नाराजी व्यक्त करीत आहेत.
सध्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या कामात दंग असताना अनधिकृत कामांचे प्रमाण वाढले आहेत तर अधिकारी वर्गाला निवडणुकीच्या कामातून बाहेर पडायला वेळ नाही आणि असे असताना कर्जत तालुक्यात असंख्य अनधिकृत कामे सुरू आहेत. त्यात वाळू काढण्याचे लिलाव शासनाने काढले नाहीत आणि तरीदेखील अनधिकृतपणें वाळू उपसा जेसीबी आणि प्रो क्लेम मशीन यांचा वापर तालुक्यातील सर्व नद्यांमध्ये रात्रंदिवस सुरू आहे.वाळू नदी मधून काढून ती जागोजागी साठवून ठेवली जात असताना देखील एरवी सतर्क असलेले तलाठी आणि मंडळ अधिकारी असे महसूल खात्याचे कर्मचारी निवडणूक कामात असल्याची उत्तरे मिळत आहेत.त्यामुळे तालुक्यातील नद्या पोखरल्या जात असून अनधिकृतपण वाळू काढली जात असताना महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने महसूल खात्याच्या आशीर्वादाने हे सुरू आहे काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.
कर्जत तालुका मोठ्या प्रमाणात जंगल असलेला तालुका म्हणून ओळखला जातो मात्र सध्या निवडणूक काळात आपल्याला कोणी अडवायला येणार नाही अशा तोऱ्यात जंगलतोड रात्रंदिवस सुरू आहे. तालुक्यात कर्जत पासून खांडस आणि झुगरे वाडी पासून बीड आणि बेडिसगाव पासून कर्जत अशा प्रत्येक भागात जंगलतोड सुरू असून राखीव जंगल देखील तोडले जात आहे.त्यात कर्जत तालुक्यात सर्वात जास्त जंगलतोड कशेळे परिसरात कळंब पासून आंबिवली भागात सुरू आहे.त्या भागात स्थानिक शेतकरी यांच्याकडून देखील जंगल तोड करण्याची परवानगी घेवून जंगले तोडली जात आहे.मात्र त्यावेळी जंगल तोडणारे ठेकेदार हे मोजून दिलेल्या जागेपेक्षा अधिक प्रमाणात जंगलाची तोड करताना दिसत असून वन विभाग त्याकडे डोळेझाक करीत आहे.वन विभाग यांच्याकडून जंगलातील झाडे देण्याची परवाना दिला गेला आहे,पण ते परवाने देताना संबंधित ठेकेदार यांच्याकडून परवाना पेक्षा अधिक झाडांची कत्तल सुरू असून कर्जत तालुक्यात आगामी काळात जंगल शोधावे लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून कर्जत तालुक्याच्या प्रत्येक भागात जमीन विकण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे जमीन खरेदी करणारे यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीवर खड्डे भरण्यासाठी असलेले डोंगर फोडण्यासाठी सपाटीकरण केले जात आहे.हे सपाटीकरण कर्जत तालुक्यातील मातीचे डोंगर उध्वस्त करीत असून कर्जत तालुका सिमेंट जंगलात परावर्तित होण्यास अवधी लागणार नाही अशा प्रकारे तालुक्यात शासनाच्या आशीर्वादाने जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक प्रकरण कर्जत तालुक्यात सुरू असून जमीन सपाटीकरण करताना काढलेली लाल माती देखील विकली जात आहे.लाल माती विकण्याचा व्यवसाय कशेळे परिसरात जोरात सुरू आहे.त्यासाठी शासनाने तत्काळ जमीन सपाटीकरण सुरू आहे तेथे तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.