गुन्हे कधीही लपत नाहीत
अंकुश शिंगाडे
मो: ९३७३३५९४५०
एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील मजकूर. तीस वर्षांनी सापडला गुन्ह्यातील आरोपी. या बातमीत आरोपीच्या नावासह उल्लेख होता. त्यानं एक हत्या केलेली होती व हत्येनंतर तो वेगवेगळी आपली नावं बदलवून वेगवेगळ्या शहरात वास्तव्याला होता. परंतू गुन्हा कधीही लपत नाही, या तत्वानुसार तब्बल तीस वर्षानं पोलिसांनी त्या आरोपीला पकडून ताब्यात घेतलं.
होय, गुन्हा कधीही लपत नाही असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण प्रत्येक गुन्हे हे काही ना काही ठोस पुरावे मागे सोडत असतात. काळाच्या ओघात ते सापडतच असतात. गुन्ह्याचे काही प्रकार आहेत.
१) गुन्हे करतांना काही लोकं राजरोषपणे करतात. अर्थातच ते जाणूनबुजून गुन्हे करीत असतात. कैदेतून सुटून येणारे बरेच कैदी हे या प्रकारात मोडतात. तसंच काही गुंड असेही असतात की ते हप्तावसूली करतात. काही लोकं जाणूनबुजून हत्याही करतात. हत्येच्या सुपाऱ्याही घेतात. त्यांना माहीत असते की असे गुन्हे केल्यास आम्हाला शिक्षा होईल. तरीही ते गुन्हेगार गुन्हे करीत असतात.
२) काही लोकं मजबुरीनं गुन्हे करतात. जसे. एखादा व्यक्ती जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीवर तलवारीनं वा धारदार शस्रानं वार करीत असेल तर त्या व्यक्तीने बचावात्मक पवित्रा उचलून त्या जाणूनबुजून वार करणा-याला ठार करणे वा एखादा व्यक्ती एखाद्या स्रीवर जाणूनबुजून अत्याचार करीत असेल किंवा बलात्काराचा प्रयत्न करीत असेल तर त्याही ठिकाणी आपल्या बचावात्मक पावले उचलणे या गुन्ह्याला मजबुरीचे गुन्हेगार समजतात.
३) काही लोकांकडून गुन्हे अनवधानानं घडून येत असतात. जसे छतावर दोघेजण गोष्टीमध्ये रममाण झाले असतांना अचानक धक्का लागणे व जीव जाणे. शिक्षिकेची विद्यार्थ्यांना मारत असतांना अचानक छडी डोक्याला लागणे व तो दगावणे. रस्त्यानं चालता चालता गाडीचे ब्रेक खराब होणे.
गुन्हे कसेही घडो. ते अनवधानाने घडो वा जाणूनबुजून, ते मजबुरीनं घडो वा इतर कोणत्याही कारणानं शिक्षेचं मापदंड सारखंच असतं. त्यामुळंच तसा गुन्हा घडल्यानंतर व्यक्ती घाबरतो. तो त्यानंतर आपल्या बचावाचे मार्ग शोधतो. त्यातच कधीकधी लेकरांचा गुन्हा असेल तर मायबाप स्वतःवर तो गुन्हा ओढवून घेतात व मुलांचा बचाव करतात. परंतु तरीही गुन्हे लपतात का? काळाच्या ओघात ते गुन्हे बाहेरच येत असतात व ते गुन्हे आपल्याकडून सत्य वदवून घेत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आपण मानव आहोत. आपण आपल्या हातून गुन्हा झाल्यास वा घडल्यास आपण लपवूनही टाकू. कारण आपल्याला माहीत असतं की आपण केलेला गुन्हा इतर माणसांनी पाहिलेला नाही. मग पुरावा कुठून मिळणार? आपण तर सुटणार आणि ते सुटतातही. कारण न्याय करणारे माणसंच असतात. त्यांना पुरावे हवे असतात. ते नसल्यानं वा न मिळाल्यानं आरोपी सुटणारच. कारण एखाद्या घटनेत पुरावे निर्माणही करता येतात आणि मिटवताही येतात. त्यानुसार न्यायदान होतं. अशा न्यायदानात लोकं बा इज्जत बरी होत असतात. कारण हे न्यायालय आपल्या घरचं असतं. आपण निर्माण केलेलं. परंतू याहीवरती एक न्यायालय असतं. ते विधात्याचं न्यायालय असतं. मग तो गुन्हा कोणताही असेना, तो विधाता ते सगळं पाहात असतो व त्या गुन्ह्यावर काही कालानंतर योग्य अशी शिक्षा प्रदान करीत असतो. ती शिक्षा महाभयंकर असते. अशारितीनं काही काळानंतर का होईना, गुन्हा बाहेर येत असतो महाभयंकर संकट येवून.
याबाबत एक कथा सांगतो. कथा महाभारतातील आहे. या महाभारतात एकदा युद्धप्रसंगी भिष्म जात असतांना त्याला सैनिकांनी सांगीतलं की त्याच्या मार्गात एक साप आला आहे. काय करावे. त्यावर प्रतिक्रिया देतांना भिष्म म्हणाले की त्याला फेकून द्या. त्यानंतर त्या सैनिकांनी त्या सापाला दूर झाडीत फेकलं. त्यानंतर तो साप त्या झाडीत एका काट्याच्या झाडावर पडला. त्याला त्या झाडावरील असंख्य काटे रुतले. त्यातच तो साप विव्हळत मरण पावला.
तो गुन्हा………तो गुन्हा भिष्माकडून झालेला. परंतू त्याची जाणीव भिष्मालाही नव्हती. परंतू गुन्हाच होता तो त्या भिष्माच्या प्रारब्धानं पाहिलेला. त्यानुसार भिष्म जेव्हा महाभारतातील युद्धात उतरले. तेव्हा त्यांच्या शरीरालाही अर्जुनाचे असंख्य काटेरुपी बाण लागले व घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली.
गुन्हे लपत नाहीत. ते बाहेर निघतातच. अगदी संकट येतात मोठमोठे. निसर्ग संकट आणत असते आपली त्या पापातून सोडवणूक करण्यासाठी. तसं पाहता या सृष्टीतील प्रत्येकच व्यक्ती गुन्हेगार आहे. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण या सृष्टीला देण निसर्गाची आहे. या निसर्गानंच सृष्टीच्या ओंजळीत भरभरुन टाकलंय. या सृष्टीतील प्रत्येक जीव हा निसर्गाची देण आहे. मग त्यात झाडंही आलीत. परंतू आपण काय करतो? काहीच नाही. मग गुन्हेगार कसे?
आपण कोंबडे, बकरे खातो, गाय खातो, मासोळी, ऊंट, रेडे, मेंढे आणि तत्सम तितरा बितरासारखे असंख्य प्राणी खातो. कोणी मुंग्या माकोडेही खातात. त्यातच कोणी कोणी फळभाज्याही खातात. कोणी झाडंही तोडतात. कोणी पृथ्वीचे पोट फाडून कोळसा काढतात. हे पापच. आपल्या हातून घडत असलेलं.
या सृष्टीतील प्रत्येकच जीव हा निसर्गाचा लेकरुच असतो. फळं. झाडांची लेकरं असतात आणि झाडं निसर्गाची लेकरं असतात. परंतू आपण आपल्या जिभेचे चोचले म्हणून ते खातो अन्न म्हणून. झाडांना तोडतो, बांधकाम करण्यासाठी. कारण आपल्यासमोर त्याला खाण्याशिवाय व तोडण्याशिवाय पर्यायच नसतं. परंतू ते पाप घडतं आपल्या हातून घडतं. घोर पाप. हे घडणारं पाप कोणीच पाहात नाही. कोणी बोलूही शकत नाही. समजा एखाद्या कोंबड्या बकऱ्याला मारलं तरी तो बोलणार नाही वा तो रागावणार नाही वा त्याबद्दल कोणी बोलूही शकणार नाही. कारण तो मुका जीव किंवा ही झाडांची गोड मधूर फळं खाल्ली तर कोणी बोलणार नाही. परंतू तो विधाता ते सगळं आपल्या हातून घडणारं पाप पाहात असतो व तो काही काळानंतर या पापावर पांघरुण घालत नाही तर फार मोठी शिक्षा देत असतो आपल्याला. ती शिक्षा त्सुनामी, अवर्षण, भुस्खलन, भुंकंप, दुष्काळ ओला व कोरडा. अर्थातच पाऊस न येणे ही देखील निसर्ग आपल्याला देत असलेली शिक्षाच आहे.
महत्वाचं म्हणजे आपल्ता हातून अनवधानानं घडून येणारे गुन्हे सोडा, परंतू जे गुन्हे आपण जाणूनबुजून करतो. ते गुन्हे शक्यतोवर आपण टाळावेत. झाडं तोडू नयेत. फळं खावू नयेत. मुके प्राणी तर कधी मारुनच खावू नये. भाजी खायची असेल तर डाळीचं वरण किंवा डाळीचे पदार्थ खावेत. तशीच जाणूनबुजून कोणाची हत्या करु नये. मग ते प्राणीच नाही तर माणसंही का असेना. कारण गुन्हे लपत नाहीत. ते उघडकीस येतात. कधी त्सुनामी रुपानं तर कधी अपघात, पूर, अवर्षण, भुस्खलन आणि भुकंप या रुपानं. अर्थातच सृष्टी आपल्याला आपल्या पापाची शिक्षा देत असते हे तेवढंच खरं आहे.