मुंबईच्या उपनगर मध्ये सातवर्षीय चिमुकलीवर सावत्र बापानेच केला बलात्कार.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई/टिटवाळा,दि.19 ऑगस्ट :- मुंबईचे उपनगर असलेल्या टिटवाळा मधून एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका सातवर्षीय चिमुकलीवर तिच्याच नराधम सावत्र बापानेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रविवारी बलात्कार केला आहे. या घटनेनंतर सावत्र बाप फरार झाला असून, त्याच्याविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी महिला टिटवाळा येथे एक वर्षापासून फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या एका कारागिराबरोबर राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून सात वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. रविवारी महिला व तो कारागीर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याची तक्रार देण्यासाठी ती टिटवाळा पोलीस ठाण्यात गेली. तिला घरी यायला दुपारचे 4 वाजले. त्यावेळी तिची मुलगी रडत होती. याबाबत तिने त्याला जाब विचारला असता त्याने सायकल अंगावर पडल्याने मुलगी रडत असल्याचे सांगितले.
मात्र, ती मुलीला दवाखान्यात घेऊन गेली. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मुलीला उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात जाण्यास सांगितले. त्यानुसार, ती मुलीला घेऊन उल्हासनगर येथील रुग्णालयात गेली. तेथे मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यानुसार सावत्र बापाविरोधात कल्याण तालुका पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.