अनास्थेचे बळी…
ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली विशेष म्हणजे याच रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी पाच जण दगावले होते. एकाच रुग्णालयात अवघ्या काही तासांच्या आत इतके रुग्ण जीव गमावत असतील तर ते आपल्या आरोग्य यंत्रणेचे मोठे अपयश आहे असेच म्हणावे लागेल. या घटनेमुळे राज्यातील आरोग्यसेवेची लक्तरेच वेशीवर मांडली गेली आहे अर्थात सरकारी रुग्णालयात अशाप्रकारची घटना घडणे ही काही नवीन बाब नाही याआधी सरकारी रुग्णालयात अनेक दुर्घटना घडल्याचे आपण पाहिले आहे.
कधी औषधांच्या तुटवड्यांमुळे, कधी वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे तर कधी आगी लागून अनेकदा रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मागील वर्षी देखील लहान मुलांच्या मृत्यूचे तांडव सरकारी रुग्णालयात पाहायला मिळत होते. प्रत्येक वर्षी कोणती ना कोणती दुर्घटना किंवा आपत्ती घडतेच आणि त्यात काही रुग्णांना असे अचानक देवाघरी जावे लागते मात्र त्यातून कोणताही धडा रुग्णालय प्रशासन आणि महानगरपालिका घेत नाही. शासकीय पातळीवर देखील दुर्घटना घडून गेल्यानंतर तोच सोपस्कार पार पाडला जातो. मृतांच्या नातेवाईकांना ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाते आणि वेळ मारून नेली जाते. चौकशी समितीतून पुढे काय निष्पन्न होते. घडलेल्या दुर्घटनेस आणि मृत्यूस कोण जबाबदार आहे, त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते हे सर्व गुलदस्त्यातच राहते. यावेळीही तेच होण्याची शक्यता आहे.
अर्थात यातून एक प्रश्न नेहमी पडतो अशाप्रकारच्या घटना किंवा रुग्णांचे मृत्यू फक्त सरकारी रुग्णालयातच का होतात ? सरकारी रुग्णालयात होणारे मृत्यू हे अनास्थेचे बळी म्हणायचे का असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. अर्थात आला केवळ रुग्णालय प्रशासनच नव्हे तर महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी देखील जबाबदार आहे. महानगरपालिका प्रशासनाचा रुग्णालयावर वचक राहिला नाही का ? रुग्णालयात योग्य सोयी सुविधा पुरविण्यात महानगरपालिका कमी पडते का असाही प्रश्न पडतो.
महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन केलेली असते. या समितीवर आमदार, खासदार, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींची वर्णी लागलेली असते. या समितीच्या सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावली जातात. रुग्णसेवा, औषधोपचार, स्वछता, रुग्णालयाची कार्यक्षमता, समस्या, त्रुटी यावर लक्ष ठेवण्याची आणि त्या सोयीसुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून रुग्णांना चांगली आरोग्यसेवा पुरवणे हे या समितीचे काम असते. जर रुग्णालयात एकाच दिवशी इतके मृत्यू होत असतील तर ही समिती काय करत होती असा प्रश्न पडतो. या समितीने रुग्णालयातील त्रुटी वेळीच प्रशासनाच्या निदर्शनास का आणून दिल्या नाहीत? केवळ खुर्च्या उबवणे हेच दक्षता समितीचे काम आहे का ? आता तरी आपण यातून बोध घ्यायला हवा.
झालेले मृत्यू खरोखरीच दुर्दैवी आहेत किमान यापुढे तरी गोरगरिबांना अशाप्रकारे जीव गमवावा लागू नये यासाठी काय करावे लागेल याचा आतापासूनच विचार करावा. जर यातून आपण योग्य धडा घेतला नाही तर अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील आणि गोरगरिबांचा जीव जातच राहील.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे