सर्वोदय महाविद्यालयात “एन.ई.पी. बास्केट” विषयावरील संवाद कार्यक्रम संपन्न

सर्वोदय महाविद्यालयात “एन.ई.पी. बास्केट” विषयावरील संवाद कार्यक्रम संपन्न

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :– सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत “एन.ई.पी. बास्केट” या विषयावर मार्गदर्शक संवादाचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पीजीटीडी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विवेक जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील नव्या संकल्पना, बास्केट प्रणालीचे महत्त्व, लवचिक अभ्यासक्रम रचना, कौशल्याधिष्ठित शिक्षण व बहुपर्यायी विषय निवडीचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. जोशी यांनी सांगितले की, एन.ई.पी. अंतर्गत दिलेले बहुआयामी शिक्षण व क्रेडिट बँक प्रणाली ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणार आहे. कार्यक्रमात डॉ. प्रीती पाटील यांनी नवीन शिक्षण पद्धतीमधील संधी, आव्हाने व विद्यार्थ्यांसाठी असलेली करिअरविषयक दिशा या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नव्या शिक्षण धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवनव्या वाटा खुल्या होत असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी या बदलांचा लाभ घेण्यासाठी उत्साहाने पुढे यावे, असे आवाहन केले.

या संवाद कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना या मार्गदर्शनातून एन.ई.पी. बास्केट प्रणाली, तिचा व्यावहारिक उपयोग व भविष्यकालीन शैक्षणिक संधी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना अगडे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. रिजवान शेख यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमित उके व डॉ. मदारे यांनी सहकार्य केले.