*गाडी खराब झाली आहे असे म्हणत मागितली लिफ्ट आणि गाडी घेऊन झाला पसार; जाम येथील घटना*

48

*गाडी खराब झाली आहे असे म्हणत मागितली लिफ्ट आणि गाडी घेऊन झाला पसार; जाम येथील घटना*

अभय प्रभाकर वांगलकर, (वय 30) रा. जेठपुरा, जिल्हा चंद्रपूर व त्यांचे मित्र असे काही कामानिमित्त चंद्रपूरवरून नागपूरला होते. दरम्यान एका अनोळखी व्यक्‍तीने खांबाडा गावादरम्यान त्याची गाडी जाम चौरस्त्यापुढे बिघडली आहे मला तेथे सोडून द्या असे म्हणून लिफ्ट घेतली.

वर्धा : कार नादुरुस्त असल्याचे सांगत रस्त्याने जात असलेल्या कार चालकाला लिफ्ट मागितली आणि संधी साधून कार पळविल्याची घटना जाम येथे घडली. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत त्याला नागपूर जिल्ह्यातील महाल येथून अटक केली. त्याच्या जवळून चोरीतील कार जप्त करण्यात आली असून आरिफ शेख लियाकत शेख, (वय 26), रा. यादवनगर जि. नागपूर असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.
16 सप्टेंबर राजी सकाळी अभय प्रभाकर वांगलकर, (वय 30) रा. जेठपुरा, जिल्हा चंद्रपूर व त्यांचे मित्र असे काही कामानिमित्त चंद्रपूरवरून नागपूरला होते. दरम्यान एका अनोळखी व्यक्‍तीने खांबाडा गावादरम्यान त्याची गाडी जाम चौरस्त्यापुढे बिघडली आहे मला तेथे सोडून द्या असे म्हणून लिफ्ट घेतली. दरम्यान अभय वांगलकर व त्यांचे मित्र चहा घेण्याकरिता जाम येथील हॉटेल मध्ये गेले असता आरोपी चहा न घेण्याचा बहाणा करून गाडीतच थांबला. त्याने संधी साधून सदर कार पळविली. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पथक आरोपीचा शोध घेत असताना ही कार नागपूर येथील माहाल परिसरात असल्याची माहिती मिळली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रात्रीच ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान आरोपीने स्वतःचे नाव आरिफ शेख लियाकत शेख असे असल्याचे सांगून सदर गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातून सदर गुन्ह्यात चोरी गेलेली एक निळ्या कलरची ह्युंदाई आय 20 कार क्रमांक एम.एच. 34 बी.आर. 0649 किंमत पाच लाख रुपये जप्त करण्यात आली. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलिस स्टेशन समुद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे सहायक फौजदार सलाम कुरेशी, हवालदार स्वप्नील भारद्वाज, मनीष श्रीवास, यशवंत गोल्हर, अभिजित वाघमारे यांनी केली.