*एटीएममध्ये स्कॅनर बसवून गंडा घालणारी पश्चिम बंगालमधील सायबर गुन्हेगारांची टोळी सक्रीय*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर:सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, एटीएममध्ये स्कॅनर बसवून गंडा घालणारी पश्चिम बंगालमधील सायबर गुन्हेगारांची टोळी सक्रीय झाली असून एमआयडीसी परिसरातील एका एटीएममधून या टोळीने एका ग्राहकाच्या खात्यातून २ लाख रुपये परस्पर लंपास केले आहे. एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
१ ते १६ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. वैभवनगर, वानाडोंगरी येथे राहणाऱ्या सुरेश बुद्धाजी देशमुख (५२) हे भाजीविक्रेते आहे. त्यांना एटीएम कार्डचा वापर करता येत नव्हता. बँकेचे सर्व व्यवहार ते मुलगा सूरज देशमुख याच्या मदतीने करीत होते. काही दिवसांपूर्वी देशमुख हे मुलासोबत महाजनवाडी येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. परंतु, पैसे निघाले नाही. त्यामुळे ते लगेच वानाडोंगरी येथील सेंट्रल बँकेत गेेले. चौकशी केली असता त्यांच्या खात्यात केवळ ७८० रुपये शिल्लक असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्या खात्यातून वेळोवेळी आभासी पद्धतीने कुणीतरी २ लाख २५५९ काढल्याचे त्यांना सांगण्यात आले.
याप्रकरणी देशमुख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एमआयडीसीतील महाजनवाडीतील एटीएममध्ये स्कॅनर लावले होते. तसेच किपॅडवर ‘हिडन कॅमेरा’ लावला होता. याच एटीएममधून सूरजने पैसे काढले होते. सायबर गुन्हेगारांनी सूरजच्या एटीएम कार्डचा डाटा आणि पासवर्ड पश्चिम बंगालमधील सायबर टोळीला पाठविला. त्या टोळीने तेथून परस्पर २ लाख रुपये काढून गंडा घातला.
लगेच बदला पासवर्ड
हिंगणा, एमआयडीसी, वाडी, जरीपटका आणि अंबाझरीतील काही ठिकाणी सायबर गुन्हेगारांनी स्कॅनर लावल्याची शक्यता आहे. ग्राहकांनी एटीएममध्ये जाऊन लगेच आपला पासवर्ड बदलवून घ्यावा, असे आवाहन सायबर क्राईमचे पोलिस अधिकारी वाघ यांनी केले आहे.