अंबड एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वृक्ष प्राधिकरणाचे दुर्लक्ष

7

अंबड एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वृक्ष प्राधिकरणाचे दुर्लक्ष

ज्ञानेश्वर तुपसुंदर – नाशिक प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक- अंबड एमआयडीसी परिसरातील एम-४१ येथील उद्योग इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात सहा ते सात वृक्षांची (आंबा, जांभूळ आदी) मुळासकट कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवार सकाळी उघडकीस आलेल्या या वृक्षतोडीच्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंपनी व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारला. वृक्षतोडीची परवानगी घेतली आहे का, असे विचारले असता कंपनीकडून “ही झाडे आमच्या आवारातील आहेत, आम्ही ती तोडून नाही तर काय करू?” असा उद्धट पवित्रा घेतल्याचे समोर आले.

यानंतर खरात यांनी तत्काळ एमआयडीसी विभागातील वृक्ष प्राधिकरण कार्यालयाला याबाबत कळविले. मात्र, अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच चालढकल करत पंचनामा करण्याचे टाळल्याचे आरोप होत आहेत. दिवसा ढवळ्या कंपन्यांच्या आवारात झाडांची अशा पद्धतीने तोड होत असताना वृक्ष प्राधिकरण कार्यालय नेमके काय काम करत आहे, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

वृक्षतोडीमुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रदूषण वाढीस अधिक खतपाणी मिळत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रशांत खरात यांनी सांगितले की, “झाडे तोडणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आम्ही लवकरच एमआयडीसी कार्यालयावर आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेनंतर औद्योगिक परिसरातील अनधिकृत वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन किती गांभीर्याने पुढाकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.