रायगड जिल्‍हयात नवरात्र उत्‍सवाचे काऊंटडाऊन सुरू

26

रायगड जिल्‍हयात नवरात्र उत्‍सवाचे काऊंटडाऊन सुरू

देवींच्‍या मूर्तींवर फिरतोय अखेरचा हात

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३

अलिबाग:- गणेशोत्सवाची सांगता झाल्‍यानंतर आता सर्वांना नवरात्रौत्‍सवाचे वेध लागले आहेत. देवीच्‍या आगमनाची सारयांनाच आतुरता आहे. या उत्‍सवाची जोरदार तयारी सध्‍या सर्वत्र सुरू आहे. मूर्तीकार देवींच्‍या मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील देवीभक्‍त देवीच्‍या स्‍वागताची तयारी करत आहेत.

या उत्सवात नऊ दिवस अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात. तसेच दांडिया, गरबा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, २ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनासह विजयादशमी (दसरा) साजरी केली जाणार आहे. नवरात्रौत्सवाला अवघे तीन चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे देवीची मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. कारखान्यांमध्ये मूर्तिकार देवीची मूर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. गणेशोत्सवानंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायची असते.

घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून, सध्या मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात असून रंगकाम वेगात सुरू आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्ती साकारण्याच्या काम गतीने केले जात आहे. साधारण आठ इंचापासून १२ फुटांपर्यंत देवी मूर्ती साकारण्यात येत आहेत.

सप्तश्रृंगी देवीची अधिक मागणी

सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिकादेवी, महिषासुरमर्दिनी , माँ वैष्णवदेवी, भवानी, एकवीरा माता अशा विविध मूर्ती तयार करण्यात येत आहेत. दुर्गा देवीच्‍या मूर्तीला सर्वाधिक मागणी असून, त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी वाढली आहे.

…रविराज पाटील
मूर्तिकार वाघ्रण
………………………..

ग्रामीण भागातही उत्‍सव

सार्वजनिक नवरात्र उत्‍सव मंडळाची देखील कामे सुरू झाली आहेत. त्‍यासाठी परीसराच्‍या साफसफाई बरोबरच मंडप उभारणी, विद्युत रोषणाईची कामे हाती घेण्‍यात आली आहेत. अलिकडच्‍या काही वर्षात नवरात्र उत्‍सवाचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. ग्रामीण भागात पारंपारीक पदधतीने नवरात्र उत्‍सव साजरा केल जातो परंतु अलीकडे शहरी भागाप्रमाणे रास गरबा, दांडिया रास याबरोबरच वि वि ध स्‍पर्धा कार्यक्रम यांची रेलचेल असते. सध्‍या देवीच्‍या मंदिरांची रंगरंगोटी सुरू आहे.

नऊ रंगांचे आकर्षण

नवारात्रोत्सव महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण या नऊ दिवसांच्या कालावधीत विशेष दिवसाचा रंग ठरवला जातो. यासाठी महिला नवरात्रीचे नऊ रंग कधी येणार याची आतुरतेने वाट पाहतात. या नऊ दिवसात त्‍या दिवसासाठी ठरलेल्‍या रंगाच्‍या साडया किंवा कपडे महिला परीधान करतात.

………………………………………….

यंदाची नवरात्री विशेष

पंचांगानुसार यंदा २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना असून, याच दिवशी देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्री साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाची शारदीय नवरात्र फक्त नऊ दिवसांची नसून पूर्ण १० दिवसांची असणार आहे. याचे कारण म्हणजे तृतीया तिथी दोन दिवस, म्हणजेच २४ आणि २५ सप्टेंबर रोजी असणार आहे.