शहरे गुदमरली; श्वास कोंडला


मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या फटाकेबाजीमुळे राज्यातील प्रमुख शहरांत रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या हवेचा निर्देशांक वाईट स्तरावर होता त्यामुळे आधीच प्रदूषित असलेली शहरांची हवा आणखी प्रदूषित झाली. वास्तविक फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असे आव्हान अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी केले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शालेय विद्यार्थ्यांना फटाके उडवणार नाही अशी शपथ दिली. न्यायालयानेही रात्री आठ ते दहा असे दोनच तास फटाके उडविण्यास परवानगी दिली होती मात्र या सगळ्या आव्हानांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करत मनसोक्त फटाकेबाजी केली. 

वास्तविक फटाक्यांचे दुष्परिणाम सर्वांना माहीत आहे तरीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारच्या आणि सेवाभावी संस्थांच्या आव्हानाला हरताळ फासत सर्वत्र फटाक्यांचा बेसुमार धूर काढण्यात आला त्याच्या व्हायचा तो परिणाम झालाच. फटाक्यांमुळे अनेक शहरांची हवा प्रदूषित झाली विशेषतः मुंबई, नवी मुंबई यासारख्या मोठ्या शहरातील हवेचे प्रदूषण चिंता वाटावी इतक्या गंभीर पातळीवर जाऊ लागले. नवी मुंबई ही त्यातल्या त्यात कमी प्रदूषित शहर म्हणून गणले जात होते मात्र या शहरातही हवेचे प्रदूषण कमालीचे वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नवी मुंबईचे प्रदूषण कमी असल्याने नवी मुंबईला स्वच्छता पुरस्कारात तिसरा पुरस्कार मिळाला पण आता नवी मुंबई हे शहरही वाईट या श्रेणीत पोहचले आहे. अर्थात याला फटाकेच जबाबदार आहेत. दिवाळीत बेसुमार फटाकेबाजी करण्यात आली त्यामुळे चांगली हवा असलेले शहर अशी ओळख असलेल्या नव्या मुंबईचीही प्रदूषित शहरात गणना झाली आहे अर्थात मुंबई, नवी मुंबई हेच शहरे नाही तर पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या शहरातही फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषण वाढले आहे. केवळ राज्यातीलच नाही तर देशातीलही अनेक शहरात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली शहरातील हवा आया वर्षीही अती प्रदूषित श्रेणीत गणली गेली आहे. आपल्या राज्यासह देशात उत्सवाच्या नावाखाली लोकांनी मनमानी करत बेसुमार फटाक्यांची आतषबाजी केली त्यामुळेच दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात फटाके उडवण्यात आले त्याच्याच परिणाम म्हणजे राज्यातील अनेक शहरे अतिप्रदुषित किंवा प्रदूषित श्रेणीत गणली गेली. 

अर्थात हवा प्रदूषित होण्यास केवळ फटाके हेच एकमेव कारण आहे असे नाही तर वाढती वाहने हे ही एक महत्वाचे कारण यामागे आहे मात्र दिवाळीत प्रदूषणाची पातळी खूप वाढते हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही आता हेच पहाना शनिवारी संध्याकाळी पुण्या – मुंबईच्या हवेची पातळी समाधानकारक या श्रेणीत होती ती अवघ्या चोवीस तासात वाईट या श्रेणीत पोहचली याचाच अर्थ बेसुमार फटाकेबाजीने हवा प्रदूषित झाली. हवा प्रदूषित झाल्याने शहरांचा जीव गुदमरला आणि नागरिकांचा श्वास कोंडला. दिवाळी नंतर अस्थमाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या दूषित हवेचा सर्वाधिक फटका लहानमुले, गरोदर महिला, वृद्ध नागरिक व व्याधीग्रस्त रुग्णांना बसला शिवाय फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या बातम्याही आपण टीव्हीवर पाहिल्या. अनेक मुले फटाक्यांमुळे जखमी झाले तर काही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागून दुर्घटना घडल्या त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. हे सर्व टाळायचे असेल तर किमान पुढील वर्षांपासून तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायला हवी. सरकारनेही फटाक्यांवर बंदी आणायला हवी आणि हो ही बंदी केवळ दिवाळी पुरतीच नको तर कायमस्वरूपी हवी कारण दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळीही फटाके वाजवले जातात. दिवाळीत त्याचे प्रमाण अधिक असते इतकेच कदाचीत त्यामुळेच दिवाळीत फटाक्यांचे दुष्परिणाम तीव्रतेने दिसून येतात. 

श्याम बसप्पा ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे 

९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here