सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी.
नागपूर ः- घरात एकटी असलेल्या 26 वर्षीय सुनेला सासऱ्याने नातवाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही खळबळजनक घटना कपिलनगरात उघडकीस आली. पी. रमेश 58, उप्पलवाडी असे आरोपी सासऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगरात राहणारी 26 वर्षीय पीडिता शिला (बदललेले नाव) हिचे पती ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यामुळे ते नेहमी ट्रान्सपोर्टमुळे बाहेरगावी असतात. तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. ती घरात शिलाई मशीनवर काम करते. तिचे पती ट्रक घेऊन मुंबईला गेले होते. त्यामुळे मुलासह ती राहत होती. दरम्यान तिच्या घराशेजारी तिच्या पतीची आत्या राहते. दोघांचेही चांगले कौटुंबिक संबंध आहेत.
आत्याचा पती पी. रमेश ट्रान्सपोर्टचा मोठा व्यावसायिक आहे. तो नेहमी शिलाच्या घरी येत-जात असे. दरम्यान रमेशची वाईट नजर शिलावर पडली. तिचा पती घरी नसताना तो नेहमी यायला लागला. मुलाला महागडे गिफ्ट देणे तसेच शिलालाही गिफ्ट देत होता. अनेकदा तो सून शिलाशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच तिच्या सौंदर्याची स्तुती करायचा. सासरा असल्यामुळे शिलाने ती बाब गांभीर्याने घेतली नाही. तीच बाब अंगलट आली.
रमेशच्या नातेवाइकाकडे लग्न असल्यामुळे कुटुंब बाहेरगावी गेले होते. 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता रमेश जेवण करण्यासाठी सुनेकडे आला. त्याने जेवण केल्यानंतर काही वेळपर्यंत तो तिच्या घरी झोपला. तासाभराने त्याने घराचे दार लावले आणि शिलाला धमकावले. पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
वडीलधाऱ्या असलेल्या सासऱ्याने चक्क सुनेला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सासऱ्याच्या या कौर्यामुळे सून नैराश्यात गेली. तिने पती घरी येताच सर्व हकिकत सांगितली. पतीच्या मदतीने कपिलनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रमेशला अटक केली.