सातार्‍यात एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू.

साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत गोपनीयता बाळगून गुरूवारी रात्रीपासून तपास सुरू केला आहे.

कराड:-  येथील सैदापूर एकाच कुटुंबातील चिमुकल्या तीन बहिणींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी  सायंकाळी संबंधित कुटुंबीयांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलींसह आईला उलटय़ा, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर गुरुवारी पहाटे यातील दोन मुलींचा, तर उपचार घेत असताना आज तिसऱया मुलीचाही मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. आस्था शिवानंद सासवे वय 9, आयुषी शिवानंद सासवे वय 3, आरुषी शिवानंद सासवे वय 8, रा. सैदापूर, ता. कराड अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

कराड शहरालगतच्या सैदापूर येथील मिलिटरी हॉस्टेलशेजारी सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी सासवे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. त्यानंतर रात्री ते झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास शिवानंद यांची पत्नी आणि आरुषी, आस्था व आयुषी या मुलींना उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिवानंद यांनी सैदापूर येथील डॉ. पाटील यांच्याकडे रात्री त्यांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांकडून औषधे घेऊन ते घरी परतले. मात्र, 16 तारखेला पहाटे आस्था, आरुषी व आयुषी यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिघींनाही उपचारासाठी कराड येथे कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले.

उपचारादरम्यान आस्था आणि आयुषी यांचा मृत्यू झाला. आरुषीला कृष्णा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारत असतानाच आज सकाळी तिचाही मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे तपास करीत आहेत. मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचा व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here