
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. : 9768545422
नवी मुंबई, २० जानेवारी: राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू असताना राज्यातील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी देखील विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
एसटी कामगारांनी एसटी महामंडळ महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यासाठी संपाचे हत्यार उचलले. त्यासाठीचा एसटी कामगारांचा संप अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. त्यांचा संप सुरू असताना राज्यातील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी देखील सुरक्षा रक्षक मंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे. यासाठी सुरक्षा रक्षकांनी नवी मुंबई येथे बुधवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा महाराष्ट्र सुरक्षा बल, माजी सैनिक बल यांचे एकत्रीकरण व्हावे आणि यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे, ही प्रमुख मागणी आहे.
तसेच सुरक्षा रक्षक मंडळ व महाराष्ट्र सुरक्षा बल एकत्र करून त्यावर अधिकारी तुकाराम मुंडे यांची वर्णी लावावी. सर्व मंडळांचा कारभार पोलीस यंत्रणे प्रमाणे चालवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरक्षा रक्षकांना कायम स्वरूपी घरे देण्यात यावी, या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. अशा नानाविविध मागण्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी ठाकरे सरकारपुढे ठेवल्या आहेत.
ठाकरे सरकारने तात्काळ सुरक्षा रक्षक मंडळाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सहकुटुंब संपावर जाण्याचा इशारा माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन संघटनेने दिला आहे.