माजी आमदार सुरेश लाड यांचे कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन सुरू
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत :- कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर माजी आमदार सुरेश लाड यांनी स्वतः पायरीवर झोपूनच हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन हे सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत आहे. लाड यांनी आरोप केला आहे की, कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू आहे. तसेच, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.सुरेश लाड हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत.
या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे. त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप माजी आमदारांनी केला आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ते पोलीस ठाण्याच्या बाहेरच आंदोलनास बसले आहेत.
या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डीडी टेले हेही ठिकाणी उपस्थित आहेत.
कल्पतरू प्रकल्पातील शेतकऱ्यांवर दबावाचा आरोप
पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी. तसेच, शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे. विशेषतः पांडुरंग शिर्के मुक्काम वर्णे या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
