अमरावती नागपुर महामार्गावर अपघात, पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा.
✒अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒
अमरावती दि.19 मार्च:- अमरावती -नागपूर महामार्गावर रिंगरोड चौकात दुचाकीला ट्रेलरची धडक बसल्यामुळे झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधी पती, त्यानंतर मुलगी आणि काही तासातच पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. गौतम शंकर मेश्राम वय 45 वर्ष, पत्नी कविता गौतम मेश्राम वय 40 वर्ष व मुलगी जिया गौतम मेश्राम वय 9 वर्ष, सर्व रा. विर्शी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
गौतम मेश्राम हे मजुरी करतात. कामगार म्हणून त्यांच्या नावाची अमरावती येथील कार्यालयात नोंद झाली होती. किट घेण्यासाठी ते पत्नी व लहान मुलीसह गुरुवारी अमरावतीला आले होते. त्यानंतर कपडे खरेदी करून सायंकाळी एमएच 27 बीयू 9945 क्रमांकाच्या दुचाकीने नांदगावपेठ येथे गेले होते. तेथून परत विर्शीकडे जात असताना महामार्गावरील रिंगरोडवर एनएल 01 एई 4677 क्रमांकाच्या ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह चिमुकली जखमी झाली. जखमींपैकी गौतम मेश्राम यांचा गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी जिया व पत्नी कविता यांना शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान आधी मुलगी जिया हिचा तर, त्यानंतर आई कविता मेश्राम यांचाही मृत्यू झाला. नांदगावपेठ पोलिसांनी ट्रेलरचालक प्रशांत रामजुध्या शर्मा (रा. अजगरी, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.