सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली संशोधनाविषयी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा
♦️ संशोधन हे समाजाभिमुख आणि मानवी मूल्यांना महत्व देणारे असावे – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 20 मार्च
आज आपल्या भागात प्रदूषणासह कॅन्सरसारख्या महाभयंकर आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. संशोधनातून त्या समस्यांची उत्तरे शोधली गेली पाहिजे. संशोधन हे समाजाभिमुख आणि मानवी मूल्यांना महत्व देणारे असावे, समाजहितासाठी संशोधन केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी येथे बोलताना केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग,रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’ (संशोधन केंद्र) व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेपिंग इनटु रिसर्च प्रिसिंक्ट : मेथॉडॉलॉजी, पब्लिकेशन अँड पेटंट्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या
उद्घाटनाप्रसंगी आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे होते, तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, मुंबई येथील डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस, नागपूर येथील ‘लेक्स रेगिया एलएलपी’ कंपनीच्या सर्वेसर्वा तथा सिनियर आयपीआर अटर्नी डॉ. उशोषि गुहा, गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, प्राचार्य राजीव वेगिनवार व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रक्षा पी.धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, करोना काळात त्यावर मात करण्यासाठी संशोधनातून लस निघाली. त्यामुळे भारताचे नाव जगात पुढे गेले. आज गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात बांबू मुबलक प्रमाणात आहे. पण संशोधनामुळे बांबूला जागतिक पातळीवर पोहोचता आले आहे. आज बांबूपासून इथेनॉल बनवले जात असून आसाममध्ये त्याचा कारखाना प्रगतीपथावर असल्याचे सांगत समाजासाठी संशोधन करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी महाविद्यालयाच्या व संशोधन केंद्राच्या वाटचालीचा यशोदायी प्रवास विशद केला.
संचालन प्रा. शीतल बोरा, तर आभार डॉ. रक्षा पी. धनकर यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर हे होते, तर यावेळी नागपूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. तपन दत्ता व समन्वयक डॉ. रक्षा पी.धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी सदर कार्यशाळा संशोधनकर्त्यांसाठी फलदायी ठरल्याचे आवर्जून नमूद केले. प्रास्ताविक डॉ. रक्षा पी.धनकर, संचालन संशोधक विद्यार्थ्यांनी रिता टेकाडे, तर आभार प्रदर्शन डॉ कविता रायपुरकर यांनी केले.
या कार्यशाळेला प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——-
तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन-
मुख्य भाषणात डॉ. अनिल करवंदे म्हणाले की, संशोधन समस्यांचे उत्तर आहे. संशोधनाची नेमकी प्रक्रिया समजावून सांगत त्यांनी संशोधनात आपल्या मूळ कामाचे संरक्षण ‘कॉपीराईट’ कायद्यान्वये केले जात असल्याचे नमूद केले. तांत्रिक सत्रात तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस यांनी संशोधनाच्या विविध शास्त्रीय पाय-या स्पष्ट करून संशोधनाद्वारे कसे नवे सिद्धांत आपल्याला मांडता येतात याची माहिती देत त्यांनी संशोधकांनी आपले ज्ञान दैनंदिन ‘अपडेट’ केले पाहिजे, असे आवाहन केले.
डॉ. उशोषि गुहा यांनी संशोधनासंदर्भात ‘क्रिएटिव्ह’चे अधिकार काय असतात आणि आपल्या कल्पना ह्या कशा आपण संरक्षित करू शकतो याकडे लक्ष वेधून त्यांनी अलीकडे वापरले जाणारे ‘पेटंट’,’ट्रेडमार्क’ व ‘कॉपीराईट’ या संदर्भात विस्तृत माहिती दिली . डॉ. तपन दत्ता यांनी संशोधनाकरिता लागणारे विविध ज्ञानाचे स्त्रोत कसे घ्यावेत, हे स्त्रोत घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि संशोधकानी स्त्रोत घेतल्याची शास्त्रीय मांडणी प्रबंधात कशी करावी यावर प्रकाश टाकला.