दाताळ्यातील क्रीडा संकुलाला मिळणार 137 कोटींची मान्यता
♦️ आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला क्रीडामंत्र्यांकडून प्रतिसाद
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 20 मार्च
राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, जिल्ह्यातील दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे या अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी 137 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीसाठी आश्वस्त केले आहे.
क्रीडामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला अप्पर मुख्य सचिव दिग्गीकर, क्रीडा आयुक्त सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रस्तावित दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुलाच्या संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. अत्याधुनिक क्रीडा सुविधांसह हे संकुल जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू या संकुलाच्या माध्यमातून ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
===
क्रीडा संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना नवी संधी
चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथे प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे स्थानिक तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. येथे अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी आणि विविध ऑलिम्पिक खेळांसाठी आवश्यक तांत्रिक व भौतिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. भविष्यातील ऑलिम्पियन आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी हे संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.