यवतमाळ व बाभुळगाव तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद.
✒ साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतीनिधी
यवतमाळ,दि.19:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणेकरीता उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांन्डर यांना प्राधिकृत केले आहे.
यवतमाळ तहसीलदारांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे यवतमाळ तालुक्यातील मौजा बोथबोडण येथील सहा ठिकाणे व मौजा हिवरी येथील दोन ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच बाभुळगाव येथील तहसीलदारांनी प्रस्तावित केल्यानुसार बाभुळगाव शहरातील व तालुक्यातील मौजा कोंढा येथील सहा ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून वरील नमुद प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.
सदर आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी व ग्रामस्तरावर गटविकास अधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित करण्यात याव्यात. परवाना, पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, ग्राम सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.
वरील आदेशांचे जे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे यवतमाळचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.