पोलीस जवानाच्या हत्येत सहभागी असणाऱ्या चार नक्षलवाद्यांना अटक
✍️लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत मोठे यश मिळाले आहे. सीआरपीएफ व गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दिरंगी-फुलनार येथे झालेल्या चकमकीत सी-६० जवानाच्या हत्येत सक्रिय सहभाग असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या चारही नक्षलवाद्यांवर एकूण ४० लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने जाहीर केले होते.
अटक केलेल्यांमध्ये दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु (डीव्हीसीएस, दक्षिण गडचिराली डिव्हीजन), वय ५५ वर्षे, रा. लिंगापूर, तह. दरपेल्ली, जि. निजामाबाद (तेलंगाना) व भामरागड एरियाची सचिव जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला (डिव्हीसीएम, भामरागड दलम/सचिव भामरागड एरीया कमिटी), वय ४१ वर्षे रा. कंचाला, तह. भोपालपट्टानम, जि. बीजापूर (छ.ग.) या नक्षलवादी दांपत्याचा समावेश असून, त्यांच्या सोबत भामरागड दलमच्या दोन महिला सदस्य झाशी तलांडी ऊर्फ गंगु (सदस्य, भामरागड दलम), वय ३० वर्षे, रा. येचली, तह. भामरागड जि. गडचिरोली, व मनिला गावडे ऊर्फ सरिता (सदस्य, भामरागड दलम), वय २१ वर्षे, रा. कापेवंचा तह. अहेरी, जि. गडचिरोली यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पल्ली जंगल परिसरात ताडगाव पोलीस व सीआरपीएफच्या ०९ बटालियनच्या एफ कंपनीने राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान, हे चारही नक्षलवादी संशयित हालचाली करताना आढळले. त्यांना चौकशीसाठी प्राणहिता उप-मुख्यालयात आणण्यात आले. चौकशीत त्यांनी त्यांच्या ओळखी कबूल केल्या व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार येथे झालेल्या चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड झाले.
या अटकेनंतर संबंधितांवर भादंवि, आर्म्स ॲक्ट, विस्फोटक पदार्थ अधिनियम व बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लाखो रुपयांचे होते बक्षीस –
सायलु ऊर्फ रघुवर ७७ गुन्हे, त्यात ३४ चकमक, २३ खून ; शासनाने २० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
जैनी ऊर्फ अकिलावर २९ गुन्हे, त्यात १८ चकमक, ४ खून ; बक्षीस १६ लाख रुपये.
गंगुवर १४ गुन्हे, १२ चकमक ; बक्षीस २ लाख रुपये.
सरितावर १० गुन्हे, त्यात ५ खून ; बक्षीस २ लाख रुपये.
या कारवाईमुळे गडचिरोली पोलिसांनी २०२२ पासून आतापर्यंत ९६ नक्षलवाद्यांना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईनंतर माओवादीविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच नक्षलवाद्यांना शस्त्र सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहनही केले आहे.