स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार चित्रलेखा पाटील यांची ग्वाही
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार, ठेका मिळाला पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. कंपनीतील सीएसआर निधीचा वापर स्थानिक विकासासाठी करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी एक वेगळ्या भुमिकेतून स्थानिकांच्या हितासाठी लढण्याची गरज आहे. अशी ग्वाही शेकाप प्रवक्त्या, राज्य मिडीया अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली.
शेतकरी कामगार पक्ष गेल कंपनी संघर्ष समितीची बैठक गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, संजय पाटील, गजानन पाटील, राजेंद्र म्हात्रे, मोहन धुमाळ, निखील पाटील, योगेश गुजर, विक्रांत वार्डे, मधूकर ढेबे, उत्तम रसाळ, देवायनी पाटील आदी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, उसर येथे गेल कंपनीचा एक प्रकल्प उभा राहत आहे. वर्षभरात या प्रकल्पाचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. हजारो कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये स्थानिक भुमीपुत्रांचे अस्तित्व टिकून राहिले पाहिजे. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या. त्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. गावातल्या गावातच रोजगार स्थानिकांना मिळवून देण्यासाठी शेकाप एक वेगळ्या भुमिकेतून काम करणार आहे. गावोगावी बैठका घेऊन आपली भुमिका लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
उसरमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हा प्रकल्प लवकरच बांधला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या काही दिवसांपासून सूरू झाले आहे. प्रकल्प निर्मितीसाठी भरावाचे काम सुरू केले आहे. या भरावामुळे बाजूला असलेली शेत जमीनीत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे पिकत्या जमीनी नापिक होण्याची भिती निर्माण झाली आहे. जगाचा पोशींदा असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्यासाठीदेखील शेतकरी कामगार पक्ष लढा देणार आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे ही भुमिका आपली राहणार आहे. तसेच प्रकल्पाचे काम सुरू असताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्या. गावातील नागरिकांना रोजगारासाठी प्राधान्य द्या. तसेच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनाही नोकरी देणे कंपनी व मेडीकल कॉलेजच्या प्रशासनाची जबाबदारी आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल इंडिया लिमिटेड कंपनीचा कोट्यवधींचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय देखील उसरमध्ये बांधले जाणार आहे. प्रकल्प येत असताना स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, याबाबत शेकाप आग्रही आहे. सरकारने कंपनी स्थापन करण्याकरिता स्थानिकांच्या जमिनी अत्यंत अल्पदरात, कवडीमोल भावात विकत घेवून त्या गेल कंपनीला वाढीव दराने विकल्या. मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे स्थानिकांना जागेचा वाढीव मोबदला मिळावा. गेल आणि शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात स्थानिक कामगारांना रोजगार मिळावा. तसेच कामांचा ठेका स्थानिकांना देण्याबाबत उपाययोजना कराव्यात. पुढील कालावधीत ज्या स्थानिकांना नोकऱ्या लागणार आहेत, त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अल्प दरात किंवा मोफत प्रशिक्षण सेंटरद्वारे स्थानिकांना शिक्षण देण्यात यावे. प्रकल्पांमुळे गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा आणि प्रदुषणाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे, या करिता उपाययोजना करणे. गेल कंपनीच्या फंडातून आजूबाजूच्या गावाचा विकास करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाची राहणार आहे. गेल कंपनी संघर्ष समितीमार्फत आदोलन करून शेतकरी, स्थानिक नुकसान ग्रस्तांना न्याय हक्कासाठी, रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.