त्वरित सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

48

त्वरित सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 19 जुलै 

सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात त्यातही चिमूर तालुक्यात झालेले नुकसान खूप मोठे आहे. नागरिकांच्या शेतात तसेच घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव (पेठ) येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास ५५ हजार हेक्टरवर शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात तसेच नागरिकांच्या घरात शिरले. यात घरांची पडझड झाली. पुराच्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ज्या घरांची अंशतः किंवा पूर्णतः पडझड झाली, अशा नागरिकांना प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आता पाणी ओसरत असल्याने नागरिक आपापल्या घरी परत जात आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात येईल. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी श्रीमती खोचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव टिके यांच्यासह प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.