अबब काय सांगता… चक्क ‘वाघावर’ म्हशीच्या कळपाने चढवला हल्ला!
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर ,20 जुलै: मुल तालुक्यातील चकदुगाळा गावालगतच्या शेतशिवारात वाघाने गाय व म्हशीच्या कळप रोखून धरला होता. बराच वेळ झाला तरी वाघाने कोणतीही हालचाल केली नाही. मात्र त्यानंतर म्हशीच्या कळपानेच हल्ला चढवित वाघाला हुसकावून लावल्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, हा वाघ अशक्त असून, कोणतीही शिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याचे चित्रफीतीतून दिसत होते.
गुरूवारी दुपारच्या सुमारास मुल तालुक्यातील चकदुगाळा व बेंबाळ येथील गुराखी गाय, बैल व म्हशी घेवून चारायला शेतशिवारात गेले होते. बेंबाळ शेतशिवार परिसरात असलेल्या पाळीवर घडलेला हा प्रकार गावकर्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीत साठवून ठेवला. वाघ उठून उभा झाल्यानंतर चक्क म्हशीच्या कळपाने एकत्र वाघावर हल्लाबोल केले. वाघ कसाबसा म्हशीच्या तावडीतून सुटत जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना दिसला. अखेर म्हशीच्या कळपाने वाघाला हुसकावून लावले. यावेळी वाघाला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गोळा झाले होते.