अम्मा’ उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
• अम्माची प्रेम, त्यांचा त्याग आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती ही आमच्यासाठी मार्गदर्शक – आ. किशोर जोरगेवार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चंद्रपूर :
अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार या प्रेम, ममत्व आणि त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी अर्पण केले. त्यांच्या संस्कारांची आणि मूल्यांची छाप आजही आमच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक सामाजिक उपक्रमात जाणवते. त्यांची स्मृती आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवार 20 ऑक्टोबर रोजी जनसंपर्क कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, महामंत्री रवि गुरुनुले, सविता दंढारे, मनोज पाल, तुषार सोम, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, ॲड. सुरेश तालेवार, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष कौसर खान, मुग्धा खाडे, माजी नगर सेवक सुरेश पचारे, राजेंद्र खांडेकर, प्रवीण गिलबिले, सायली येरणे, कल्पना शिंदे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित राहून अम्मा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी अम्मा यांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा उल्लेख करत, अशा व्यक्तींच्या आदर्शातून समाजसेवेचा दीप अधिक तेजस्वी करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान अम्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, अम्मा आमच्यासाठी केवळ माता नव्हत्या, तर त्या आमच्या प्रेरणेचा आणि आत्मविश्वासाचा स्रोत होत्या. त्यांचे प्रेम, त्यांचा त्याग आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.
अम्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत अम्मा संस्कार केंद्र, अम्मा का टिफिन, अम्मा की दुकान आणि अम्मा की पढाई यांसारख्या उपक्रमांमुळे आज अनेक गरजू लोकांना मदतीचा हात मिळत आहे. या सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात सेवा, शिक्षण आणि संस्कार यांची नवी चेतना निर्माण होत आहे.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला मंडळ सदस्य आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अम्मा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा दीप अधिक तेजस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी या प्रसंगी व्यक्त केला.