सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान

सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान

सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान

📍चिमुरात सर्वाधिक, तर चंद्रपूर नेहमीप्रमाणे उदासीनच
📍2019 च्या निवडणुकीची टक्केवारी यंदा तासाभरापूर्वी गाठली

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 नोव्हेंबर
तुलनेने यंदाच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह जाणवला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील मतदानाची सरासरी 64.48 टक्के राहिली. एकूण टक्केवारी वृत्त लिहेस्तोवर यायची होती. पण ती निश्चितपणे समाधान देणारी असेल. कारण योगायोगाने, 2019 च्या विधानसभा निवडणुकीची एकूण टक्केवारी ही 64.48 टक्के होती, जी यंदा सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्याने गाठली आहे. पुढच्या तासाभरात वाढणारी मतदानाची टक्केवारी ही बोनस ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी बुधवार, 20 नोव्हेंबरला उत्साही मतदान पार पडले. जिल्ह्यातील सहाही मतदार संघात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाले. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी या सहाही मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान झाले आहे. त्यातही सर्वाधिक मतदार चिमुरात 74.82 व ब्रम्हपुरीत 72.97 टक्के झाले. तर सर्वांत कमी नेहमीप्रमाणे 53.57 टक्के मतदान चंद्रपूर मतदार संघात झाले. जिल्ह्यात 63.11 टक्के पुरूषांनी, तर 65.90 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राजुरा 65.59, बल्लारपूर 63.44, तर वरोडा मतदार संघात 60.21 टक्के मतदान झाले. रिंगणातील 94 उमेदवारांचे भाग्य आता मतदान यंत्रात बंद झाले असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तेव्हा कुणाचे भाग्य उजळेल, हे कळेल.
मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला. 11 वाजेपर्यंत चिमूर, ब्रम्हपुरी वगळता उर्वरित मतदार संघात मतदारांची केंद्रांवर गर्दी नव्हती. त्यामुळे कमी मतदान दिसले. चिमूर मतदार संघात सर्वांधिक 24.68 टक्के मतदान झाले होते. तर बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 21.62 टक्के, वरोडा 19.2, राजुरा 22.84, ब्रम्हपुरी 24.15 तसेच चंद्रपूरमध्ये सर्वात कमी म्हणजे 17.63 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत या टक्केवारीत थोडी वाढ झाली. सर्वाधिक मतदान चिमूर आणि ब्रम्हपुरी मतदार संघात झाले. चिमुरात 41.4, तर ब्रम्हपुरीत 39.91 टक्के, तर सर्वांत कमी चंद्रपूर मतदार संघात 29.3 टक्के मतदान झाले होते. राजुरा 37.22, बल्लारपूर 35.41, वरोडा 32.24 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 49.87 टक्के मतदान झाले. तेव्हाही सर्वांधिक चिमूर मतदार संघात 57.79, तर सर्वांत कमी 41.44 टक्के मतदान चंद्रपूर मतदार संघात होते. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी 56.34, राजुरा 51.52, बल्लारपूर 48.82 तर वरोडा मतदार संघात 49.87 क्के मतदान झाले.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघासह अन्य विधानसभा संघातही शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ब्रम्हपुरी मतदार संघात कुठे धिम्या गतीने यंत्र चालत असल्याची तक्रार आली. वरोड्यातील जिल्हा परिषद शाळेतील 172 या केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास मतदान खोळंबले होते. अधिकारी वर्ग ताबडतोब मतदान केंद्रावर पोहोचला व त्यांनी बंद पडलेले मतदान यंत्र दुरुस्त केल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. तर सिंदेवाही शहरातील राम मंदिराजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान चालू असताना दोन गटांमध्ये काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिस यंत्रणा व निवडणूक अधिकार्‍यांनी वेळीच दखल घेत हा तणाव शांत केला. चिमूर व मुल येथेही थोडा तणाव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here