शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

जिद्द, मेहनत आणि यशाबद्दलचा आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर काष्टी गावातील ( तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ) एका सामान्य गरीब कुटुंबातील मुलाने मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदापर्यंत मजल मारत तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सोमनाथ पांडुरंग थोरात या गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाने यावर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हे यश संपादित केले आहे. त्याचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतही गुणवत्ता ठासून भरली असून त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवू शकतात हे दाखवून देणारे आहे.

अहमदनगर – पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील काष्टी या गावातील सोमनाथ पांडुरंग थोरात याचे प्राथमिक शिक्षक काष्टीतीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. जनता विद्यालय काष्टी येथून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अकरावी बारावीचे शिक्षण त्याने दौंड येथील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातून घेतले. बारावीला चांगले गुण मिळवून माळेगाव येथून बीएससी ऍग्री व पुणे येथून एमसी ऍग्री हे उच्चशिक्षण घेतले मात्र वडील पांडुरंग थोरात यांची मुलाने कलेक्टर व्हावे अशी इच्छा होती. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग सोमनाथने रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदापर्यंत मजल मारली.

आपल्या यशबद्दल बोलताना सोमनाथ म्हणाला आई वडिलांची हलाखीची परिस्थिती हीच माझी प्रेरणा आहे. यासर्व प्रवासात चुलते प्रा. बाळासाहेब शंकर थोरात व संभाजी शंकर थोरात ( मुख्याध्यापक ) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे सांगायलाही तो विसरला नाही. सोमनाथच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमनाथचे यश ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here