काही दिवसांपूर्वीच राणे यांनी रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून त्यांचा खरा चेहरा समोर आणू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. रत्नागिरीत काल झालेल्या रिफायनरीविरोधी सभेतही राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘प्रकल्पाला शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंनीच परवानगी दिली. जीआरही त्यांनीच काढला. त्यांनीच परवानग्या द्यायच्या आणि त्यांनीच विरोध करायचा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकांना उल्लू बनवण्याचं काम करत आहेत,’ असं राणे म्हणाले.
प्रकल्पाला विरोध असल्याचं ते सांगतात, पण दुसरीकडे आतून जमिनींचे व्यवहार करायचे. ही शिवसेनेची निती आहे. हिंमत असेल तर उद्घव यांनी कोकणातील प्रकल्प रद्द करून दाखवावेत, असं आव्हानही राणेंनी दिलं. कुणाच्या दबावाखाली पोलीस आणि महसूल अधिकारी सर्वसामान्यांना त्रास देत असतील तर खपवून घेतलं जाणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.