KEMच्या शंभर नर्सेस ‘ऑन ड्युटी’ पिकनिकला

59

मुंबई-देशात सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रुग्णालयाच्या यादीत सहाव्या स्थानावर असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयातील १०० पारिचारिका (नर्स) रुग्णांना वाऱ्यावर सोडून पिकनिकवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व पारिचारिका रुग्णालयातील मस्टरवर सही करून ‘ऑन ड्युटी’ सहलीवर गेल्याने आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या पारिचारिका ठाण्यातील घोडबंदर रोड येथील रॉयल रिसॉर्टवर पिकनिकचा आनंद लुटत आहेत. ५०-५० ची तुकडी करून या पारिचारिका पिकनिकला जात आहेत. काल एक तुकडी गेल्यानंतर आज सकाळी ७ वाजता ५० पारिचारिकांची दुसरी तुकडी सहलीवर गेली. केईएम रुग्णालयात सध्या बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद असल्याने हे पारिचारिकांच्या पथ्यावरच पडले आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी रुग्णालयाकडून परवानगी दिली जाते. परंतु, या सर्व पारिचारिका स्टाफ नर्स आहेत. आज सकाळी रुग्णालयात पोहोचल्यानंतर ५० पारिचारिकांनी मस्टरवर स्वाक्षरी केल्या. व त्यानंतर सहलीसाठी रवाना झाल्या. पारिचारिका सहलीसाठी गेल्याने रुग्णालयातील सेवा सध्या वाऱ्यावर आहे. या पिकनिकबद्दल अनेक विभागांच्या प्रमुखांनाही माहिती नाही. केईएम रुग्णालयात १६७ पारिचारिकांची आधीच कमतरता आहे. त्यात ५० पारिचारिकांना एकाचवेळी सहलीसाठी जाण्याची परवानगी कशी काय मिळते?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.प्रत्येक वर्षी नियोजन करून रुग्णसेवा बाधित होणार नाही, याची काळजी घेऊन तुकडीनुसार पारिचारिक या स्वतःच्या पैशांनी सहलीला जात असतात. वर्षभर रुग्णांची सेवा करणाऱ्या पारिचारिकांनी कामांचे नियोजन करून या सहलीचं आयोजन केलं आहे, अशी माहिती देत केईएमचे अधिष्ठाता डॉ. सुपे यांनी नर्सेसच्या पिकनिकचं समर्थन केलं आहे.