अफवांमुळं अनेक राज्यांत अॅलर्ट

54

 

सोशल मीडियावर काही संघटनांनी आरक्षणाविरोधात आज कथित ‘भारत बंद‘ची हाक दिल्याने अनेक राज्यातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली असून अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. २ एप्रिल रोजीच्या ‘भारत बंद’ दरम्यान झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच ‘भारत बंद’च्या अफवेला अधिक बळ मिळू नये म्हणून उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर २ एप्रिल रोजी ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. त्या दरम्यान काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा भडकली होती. त्यानंतर पुन्हा १० एप्रिल रोजी ‘भारत बंद’ असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘आरक्षणाविरोधात एकत्र या आणि निदर्शने करा,’ असे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राजस्थानात संचारबंदी लागू करण्यात आली असून अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयानेही सोशल मीडियावरील या कथित बंदची दखल घेऊन सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या गाइडलाइन नंतरही राज्यांमध्ये हिंसा भडकल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक व्यक्तीगतरित्या जबाबदार असतील, असं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.