बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन!
बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी
बीड :- येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला जिवंत पकडल्यानंतर त्याला तुरुंगात ठेवल्यानंतर फाशी होईपर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या संजय कांबळेंची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.
कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात सुरु झाल्यानंतर जिल्हा कारागृहातील काही कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडून कैद्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अधून मधून हा आकडा कमी अधिक होई.
चाळीशीतील अधिकारी असलेले संजय कांबळे मुंबईत नेमणूकीवर असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अजमल कसाब याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. बीडमध्ये कारागृहाच्या सुरक्षेसह त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेतला होता. त्यांच्या सुस्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने वाढला होता.