दोन अल्पवयीन मुलींसह आईची पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

54

दोन अल्पवयीन मुलींसह आईची पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

कोल्हापूर:- दोन मुलींसह आईने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. सुनेत्रा संतोष सावळकर वय 35, रा. वडणगे, ता. करवीर, श्रीशा वय 11 आणि सम्राज्ञी वय 7 अशी आई व 2 मुलींची नावे आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावरच आई व लेकींनी अशी आत्महत्या केल्याने वडणगे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजु शकले नसल्याने ही आत्महत्या की घातपात यावरुन संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे, ता. करवीर येथील बेघर वसाहतीत सुनेत्रा सावळकर या दोन मुली आणि सासू-सासरे यांच्यासोबत रहात होत्या. बांधकाम व्यावसायिक असणा-या त्यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. कुटुंबाच्या चरितार्थ चालवण्यासाठी त्या एका सराफ दुकानांत खासगी नोकरी करत होत्या.

काल शनिवारी नेहमीप्रमाणे कामावर बाहेर पडताना,दोन लहान मुलींना सोबत घेऊन गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. शोधाशोध करूनही सापडत नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत कळविले होते.

दरम्यान, आज सायंकाळी पंचगंगा घाटावर या तिघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत अग्निशामक दल व पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने मृतदेह पाण्याबाहेर काढुन सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. आई आणि तिच्या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. करवीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या आत्महत्येची नोंद करण्यात येत होती.