वरुड महिलेसह चौघांच्या टोळीने केली अनेक ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज जप्त, टोळीला अटक.
अमरावती/वरुड :- स्थानिक गुन्हेशाखेने शनिवारी ता. 5 वरुड येथील घरफोडीत एका महिलेसह चौघांना अटक केली. शेख नसीम शेख सलीम वय 33, दोघेही रा. सादियानगर, अमरावती, सीमा, शेख तौसिफ शेख लतीफ वय 19, रा. अन्सारनगर व विवेक यादव कुंबलकर रा. संतोषीनगर, अमरावती अशी अटक झालेल्या चौघांची नावे आहेत.
26 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत वरुड ठाण्याच्या हद्दीत दिवसाच दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने जप्त केले. नमूद चौघांकडून 99 हजारांचे सोन्याचे दागिने, 36 हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपयांची कार, 1 दुचाकी असा एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सीमा व तिच्या साथीदारांनी वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर व कारंजा लाड येथील दिवसाच्या दोन घरफोड्यांचीसुद्धा कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस रेकॉर्डवर अनेक गुन्हे
सीमा हिला यापूर्वीही अनेकदा अटक झाली. अमरावती ग्रामीणमध्ये तिच्यावर 24 चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असून, आयुक्तालयातही पोलिसांच्या रेकॉर्डवर तिचे नाव असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुवर्णकार पहिल्यांदाच गजाआड
सीमा, शेख नसीम व शेख तौसिफ या तिघांनी केलेल्या घरफोडीमधील ऐवज संतोषीनगर, अमरावती येथील सुवर्णकार विवेक कुंबलकर याला विकत होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुवर्णकाराला पहिल्यांदाच अटक केली.