मित्राच्या शरीराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्या.
रायगड :- मित्राची हत्या करुन त्याच्या शरीराचे 11 तुकडे करून सुटकेसमधून फेकणाऱ्या आरोपीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. 16 डिसेंबर 2020 रोजी नेरळ रेल्वे स्टेशन जवळच्या नाल्यात एक मानवी अवयव मिळाला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली असता तेथे दोन सुटकेस सापडल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्यात पुरुषाच्या शरीराचे अकरा तुकडे सापडले. यानंतर एकच खळबळ उडाली होती. नेरळ पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरु केला. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. चार्ल्स नाडर आणि त्याची पत्नी सलोमी पेडराई अशी आरोपींची नावं आहेत
नेरळ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 7 पथकं स्थापन करण्यात आलीत. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात एका व्यक्तीबाबत संशय व्यक्त केला जात होता. संशयित व्यक्तीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात रक्ताचे कपडे सापडले. मात्र, संशयित व्यक्ती फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत व्यक्तीचं नाव सुशीलकुमार सरनाईक आहे. तो वरळीतील गांधीनगर येथे राहत होता. मृत सुशील हा सलोमी हिचा मित्र आहे. सुशील हा चार्ल्सच्या घरी आला होता. तेथे सर्व दारू प्यायले. त्यानंतर सुशीलने चार्ल्सच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर चार्ल्सला या बोलण्याचा राग आला आणि त्याने सुशीलची हत्या केली. हत्येनंतर त्याच्या शरीराचे अकरा तुकडे केले आणि ते नाल्यात फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.