वीस हजारांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात.
पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री सांगवी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
शंकर एकनाथ जाधव वय 56, असे रंगेहाथ पकडलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.
पिंपरी चिंचवड:- एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली. त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 20 हजार रुपये द्यायचे ठरले.
तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शनिवार ते सोमवार या कालावधीत सापळा लावला. सोमवारी 20 हजारांची लाच घेताना एसीबीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधवला रंगेहाथ पकडले.
दरम्यान, या प्रकरणात सांगवी पोलीस ठाण्यातील एका अधिका-याचा हात असल्याचे म्हटले जात होते. एसीबीने सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बराच वेळ चौकशी केली. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषी नसून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोषी असल्याचे आढळल्यानंतर याबाबत मंगळवारी गुन्हा दखल करण्यात आला आहे.