कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आंदोलनाची धग कायम, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू.
दिल्ली:- हाडे गोठवणारी थंडी आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊसही कोसळतोय. पण तरीही शहरांच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. सोमवारी केंद्र सरकारने शेतकरी प्रतिनिधींना वाटाघाटीसाठी बोलावले असले तरी तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीची कायदेशीर तरतूद करावी या दोन मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीत रविवारी एका 18 वर्षीय तरुण शेतकऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या 39 दिवसांत तब्बल 54 आंदोलक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत.
दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच पेटले आहे. थंडी-पावसाची तमा न बाळगता हजारो शेतकरी दिल्लीच्या सर्व सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पेचात सापडले आहे. शेतकरी कृषी कायदे मागे घ्या, या मागणीवर ठाम असताना सरकार मात्र कृषी कायदे मागे घेणार नाही, या मतावर अडून बसले आहे. उद्या सोमवारी केंद्र सरकार शेतकऱयांशी वाटाघाटी करणार असून त्यात अंतिम तोडगा निघण्याची शेतकऱयांना आशा आहे. मात्र तोडगा नाही निघाला तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. 26 जानेवारीला दिल्लीत ट्रक्टर परेड काढू, असा इशाराच शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातून हजारो शेतकरी रवाना
कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, संभाजीनगर, नगर आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्हय़ांतील हजारो शेतकरी आज दुपारी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या झेंडय़ाखाली नागपुरात एकत्र आले होते. संविधान चौकातील बैठकीनंतर शेकडो वाहनांतून हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती नागपूर जिल्हा चिटणीस अरुण वनकर यांनी दिली.
रविवारी 4 शेतकऱ्यांचा मृत्यू
राजधानी नवी दिल्लीत गेल्या 39 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनात रविवारी 4 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यात दोन शेतकरी हे हरयाणा तर दोघे पंजाब येथील रहिवासी असल्याचे कळते. गेल्या 39 दिवसांत आतापर्यंत 54 शेतकरी या आंदोलनात शहीद झाले आहेत. दरम्यान, अन्य एका शेतकऱयाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रोहतक येथे उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.