मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडला तर पोलीस पालकांवर गुन्हा दाखल करणार.

58

मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडला तर पोलीस पालकांवर गुन्हा दाखल करणार.

राज्यात नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रासपणे मांजाचा वापर सुरु आहे.

नाशिक:- नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे कोणत्याही लहान मुलाकडे नायलॉनचा मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होईल. अशा मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यामुळे आतातरी मांजाच्या वापराला आळा बसणार का, हे पाहावे लागेल. राज्यात नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रासपणे मांजाचा वापर सुरु आहे. मात्र, आता पोलिसांच्या आदेशामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे गळा चिरुन महिलेचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये भारती जाधव यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरुन मृत्यू झाला होता. त्या दुचाकीवरुन घरी जात असताना भारती या नाशिकमधील सातपूर भागात असलेल्या आपल्या कार्यालयातून नेहमीप्रमाणे दुचाकीने घरी जात होत्या. त्यावेळी द्वारका पुलावर मांजाने गळा चिरल्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेमुळे मांजावरील बंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पिंपरीत डॉक्टर तरुणीचा मृत्यू

पतंगाच्या मांजामुळे गळा चिरुन दोन वर्षांपूर्वी पिंपरीत डॉक्टर तरुणीला प्राण गमवावे लागले होते. पुण्याच्या कृपाली निकम यांचा पतंगाच्या मांजाने गळा चिरुन मृत्यू झाला होता. तत्पूर्वी मीडिया कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचाही अशाचप्रकारे मांजाने गळा कापून मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वीच चायनीज मांजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, मकरसंक्रांतीच्या सणाच्या आसपास मांजाची विक्री पुन्हा सर्रास सुरु होते. या काळात असंख्य पक्षी मांजात अडकून जायबंदी होतात. तसेच पादचारी आणि दुचाकीस्वार यांना मांजाने चिरुन गंभीर दुखापती झाल्याचे प्रकारही घडतात.