नागपुरात अनाथ 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं दिल्लीतील तरुणाशी लग्न लावण्याचा प्रयत्न.

60

नागपुरात अनाथ 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं दिल्लीतील तरुणाशी लग्न लावण्याचा प्रयत्न.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात बाल कल्याण समितीला एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचवण्यात यश मिळालं. या 16 वर्षीय मुलीचं दिल्लीतील एका युवकासोबत लग्न लावून देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, बाल कल्याण समितीने हस्तक्षेप केल्याने हे लग्न थांबवण्यात आलं. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे 

नागपूरच्या लष्करी बाग परिसरात एका अल्पवयीन मुलीचं लग्न होत असल्याची गुप्त माहिती बाल कल्याण समिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी संपूर्ण माहिती गोळा केली. यात संबंधित मुलीचं वय 16 वर्षांचं असून तिला आई वडील नसल्याचं स्पष्ट झालं. त्या मुलीचं लग्न दिल्लीच्या युवकासोबत केलं जातं आहे. यावरून संशय आल्याने तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला, अशी माहिती बाल कल्याण समिती अधिकारी मुसताक पठाण यांनी दिली.

मुलीला आणि तिच्या लहान भावाला सुरक्षागृहात पाठवण्यात आलं. अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या युवकाला कायद्यानुसार युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आलं. मुलीला आमिष देऊन किंवा फुस लाऊन हा विवाह करण्यात येत होता असा संशय आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

मागील काही काळात अल्पवयीन मुलींना फसवून किंवा फूस लाऊन, लग्नाचं आमिष दाखवत त्यांची विक्री केल्याचे आणि देहविक्री व्यवसायात ढकलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील या बाजूने तपास सुरु आहे. या प्रकरणात बाल कल्याण समितीने अल्पवयीन मुलीला वाचवल्याने सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.