भंडारा महर्षी विद्यामंदिर प्रकरण, आमदारांसह 50 पालकांवर गुन्हे दाखल
भंडारा :- सीबीएसई शाळांच्या भोंगळ कारभाराविरोधात काही दिवसांपासून पालकांचे सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. महर्षी विद्यामंदिरात शुल्क भरले नाही म्हणून मुलांना परीक्षेला बसू दिले नसल्याच्या तक्रारीवरून पालक शाळेत गेले. तेव्हा त्यांना परत पाठविण्यात आले. यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत पालकांनी महर्षी विद्यालयात शिरून जाब विचारला. तेव्हा दोन्ही पक्षाकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हा आमदारांसह पालकांनी शाळेतच ठाण मांडल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. शेवटी रात्री जवाहरनगर पोलिसांनी आमदार भोंडेकर, प्रवीण उदापुरे यांच्यासह 50 पालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हातील इंग्रजी व सीबीएसई शाळांकडून पालकांची लूट केली जाते. तसेच शाळांच्या गैरकारभारावर शिक्षण विभागाने शाळांच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी. शाळांवर प्रशासकांची नियुक्ती करावी या मागण्यांसाठी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात पालकांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, महर्षी विद्यामंदिराच्या व्यवस्थापनाने शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या व्हॉटस्ऍप ग्रुममधून काढून सराव परीक्षेला बसू दिले नाही. याबाबत काही पालक शाळेत विचारणा करण्यास गेले असता त्यांना आवारातही प्रवेश न देता परत पाठवण्यात आले, असा आरोप पालकांनी केला.
जिल्ह्यातील काही सीबीएसई शाळांच्या व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार सुरू असून शिक्षणाधिकाऱ्यांनी काही शाळेतील मुख्याध्यापकांना अवैध ठरविले आहे. त्यामुळे विद्यार्थांचे भाविष्य धोक्यात आले आहे. तेव्हा अशा शाळांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उदापुरे यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी सराव परीक्षेत महर्षी विद्यामंदिरच्या प्रशासनाने शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. तेव्हा संतापलेले पालक आमदारांकडे गेले. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका आशा गायधने यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात आमदार भोंडेकर यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे शाळेच्या कारभाराविरोधात सोमवारी दुपारी आमदार नरेंद्र भोंडेकर, सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात शंभरावर पालक महर्षी विद्यामंदिरात गेले. त्यांनी मुख्याध्यापिका यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्यासह व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनीच आमदारांसह पालकांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, असा आरोप पालकांनी केला आहे. यात पालक मातांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आमदारांसह पालकांनी शाळेच्या मुख्यदारावर ठाण मांडले. आमदार भोंडेकरांनी शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यासाठी तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस प्रशासन, शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत हजर झाले होते. अखेर शाळा प्रशासनाने नमते घेतल्यावर रात्री हे आंदोलन निवळले.
ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा –
‘महर्षी विद्यामंदिर बेला येथे विद्यार्थी व पालकांची पिळवणूक केली जाते. यात सविता तुरकर यांच्या मुलीला परीक्षेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काही महिला पालकांसोबत विचारणा करण्यास सोमवारी शाळेत गेल्यावर प्राचार्य श्रुती ओहळे व शिक्षक नवीन आगासे यांनी शिवीगाळ केली. याबाबत माहिती दिल्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर काही कार्यकर्त्यांसह शाळेत आले. तेव्हा कोण आमदार? आम्ही नाही ओळखत, असे सांगून धमकी दिली. शाळा प्रशासनाने पालकांना सन्मानाची वागणूक न देता गेटवरून परत पाठविले. शिवीगाळ करणे, अंगावर धावून येणे हा सर्व प्रकार ठाणेदार ताजणे आपल्या डोळ्यांनी पाहत होते. तसेच पालकांनी आमदारांसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली तर, त्याची दखलही पोलिसांनी घेतली नाही. उलट आमदारांसह पालकांवर गुन्हे दाखल केले. शाळेत गेलेल्या पालकांवर घरात शिरून मारहाण केल्याचे कलम नोंदविले आहे. त्यामुळे ठाणेदार ताजणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी’, अशी मागणी आशा गायधने यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी सविता तुरकर, शालिनी नागदेवे, सीमा उके उपस्थित होत्या.