एअर गन चालविण्याच्या नादात झाला युवकाचा मृत्यू .

57

एअर गन चालविण्याच्या नादात झाला युवकाचा मृत्यू .

नागपूर:- एअर गन कशी चालवितात याचे प्रात्यक्षिक दाखवित असताना एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी काटोल रोडवरील दाभा चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत लोकेश जंगलूजी गजभिये 42 असून आरोपी पंकज विलास वाणी 42 आहे. दोघेही दाभा परिसरात राहतात. गिट्टीखदान पोलीसांनी पंकजला अटक करून एअर गन जप्त केली आहे.

पंकज मुंबईत एका खासगी कंपनीत एक्झिकेटिव्ह म्हणून काम करत होता. लॉकडाऊनच्या काळात तो नागपुरात परत आला. दरम्यान, त्याने इतवारी येथून एअर गन खरेदी केली. एकाच परिसरात रहिवासी असल्याने पंकज व लोकेश यांच्यात मैत्री होती. दुपारी 3.30 वाजता पंकज लोकेशच्या भेटीसाठी त्याच्या घरी आला. त्याने लोकेशला आपली बंदूक दाखविली. ती कशी चालवितात याचे प्रात्याक्षिक पंकज दाखवीत होता. लोकेशच्या घराच्या बाजूला रिकामी जागा आहे. तिथे त्यांचे प्रात्यक्षिक सुरू होते. पण बंदुकीतील छर्रा नळीत फसल्यामुळे शूट होत नव्हते. अशात पंकजने पुन्हा बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि लगेच गोळी बाहेर पडली. समोर लोकेश उभा होता. बंदुकीतील छर्रा त्याचा डोळा फोडून बाहेर पडला. तो गंभीररीत्या जखमी झाला. पंकज लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे त्याचा मृत्यू झाला.

परिसरातील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. गिट्टीखदान ठाण्याचे निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर हे पथकासह रुग्णालयात पोहचले. पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बंदूक ताब्यात घेतली. लोकेशच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पोलिसांनी पंकजविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.