Sawitribai-phule.jpg-Landscape
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कविता

 

Savitribai phule marathi poem
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कविता

सिद्धांत
३ जानेवारी २०२१: देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचताना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना तत्कालीन जुनाट समाजव्यवस्थेचा अतोनात विरोध झाला. पण सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना समाजकार्यामध्ये मोलाची साथ दिली. समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी, जुनाट रूढी-परंपरा सोडून देण्यासाठी आवाहन करत साध्या, सरळ, सुंदर बोलीभाषेत प्रबोधनपर कविता लिहिल्या.

सावित्रीबाई फुले यांनी ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह लिहिले होते. पहिला कवितासंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा कवितासंग्रह १८८२ साली प्रसिद्ध झाला होता. या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंनी स्वातंत्र्यविषयक, सामाजिक सुधारणेच्या आवाहन करणाऱ्या, निसर्गविषयक आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता लिहिल्या. आज शंभरहून जास्त वर्षानंतरदेखील सावित्रीबाई फुले यांच्या कविता आजही समर्पक आहेत. आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिम्मित त्यांच्या कवितांवर फिरवलेली एक नजर.

त्याकाळी स्त्रियांना, उपेक्षित समाजातील लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला जात नव्हता. तसेच या समाजामध्ये शिक्षणाविषयी उदासीनता होती. अश्या समाजामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे आवाहन करताना सावित्रीबाई फुले म्हणतात,

‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हाशिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ (शूद्रांचे दुखणे)
‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’ (श्रेष्ठ धन)
‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो, शिकण्यासाठी उठा ’ (शिकण्यासाठी जागे व्हा)

 

 

 

 

स्त्रियांचे शिक्षण, जातीवादाचा नायनाट, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या सुधारणांसाठी महात्मा फुले आयुष्यभर झटले. सावित्रीबाईंना शिक्षित करून त्यांना देशातील पहिली महिला शिक्षिका बनवले. ज्योतीबांच्या महान समाजसेवेच्या कार्याबद्दलचा वाटणारा आदर सावित्रीबाईंनी आपल्या कवितेतून अश्या रीतीने मांडला आहे,

‘ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी… (ज्योतिबांना नमस्कार)’
‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला… (संसाराची वाट)’

 

 

 

सामाजिक कवितांबरोबरच आपल्या आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचे वर्णन करणाऱ्या सुंदर कविताही सावित्रीबाईंनी लिहिल्या आहेत. 

‘पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो
(पिवळा चाफा)’
‘फुल जाई
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
(जाईचे फूल)’

 

ज्याकाळी महिलांना शिक्षण घेण्यासही अश्या काळात सावित्रीबाईंनी लिहिलेल्या कविता म्हणजे मराठी वाड्मयातील एक क्रांतीच आहे. पुढील शेकडो वर्षे सावित्रीबाईंच्या या कविता स्त्रियांना, उपेक्षित समाजातील लोकांना समाजसुधारणेसाठी प्रेरणा देत राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here