विरोधात असताना अयोग्य, सत्तेत असताना योग्य: गोंधळ ईव्हीएमचा

74
EVM Machine information
is EVM safe for indian elections?

ईव्हीएम हॅक करता येऊ शकते का? तंत्रज्ञांचे काय म्हणणे आहे? ईव्हीएम सुरक्षित कि असुरक्षित?

 

मनोज कांबळे
१५ मार्च, मुंबई: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमचा मतदानासाठी होणार वापर सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. १९८२ साली केरळ मधील पारूर मतदारसंघाच्या विधानसभा निवडूणुकीत ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. या पहिल्या प्रयोगानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने  ईव्हीएम वापरावर बंदी घातली होती. १९८९ साली भारत इलेट्रॉनिक्सच्या मदतीने निवडणूक आयोगाने सुधारित ईव्हीएम यंत्राची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि अखेर अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करत १९९८ सालापासून ईव्हीएमचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नियमितपणे होवू लागला. अमेरिकेसह जगातील अनेक प्रगत देश सुरक्षेच्या कारणास्तव आजही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला टाळून पेपर बॅलेटने मतदान करतात. भारतामध्ये गेल्या दशकभरापासून ईव्हीएम मधील अफरातफर होत असल्याच्या आरोपांना वाढच होत आहे. सोशल मीडियाच्या प्रसारानंतर स्थानिक पातळीवर गाडीमध्ये पडलेल्या ईव्हीएम मशीन्स, VVPAT स्लीप्स यांसारख्या घटनांचे विडिओ व्हायरल होत असतात. त्यातच २०१४ पासून भाजप सत्तेत आल्यावर स्थानिक, राज्यपातळी आणि देशपातळीवरील निवडणुकांमध्ये भाजप ईव्हीएममध्ये फेरफार करत आल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातो. पण खरंच तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करता येऊ शकते का?

ईव्हीएम हॅक करता येऊ शकते का?
नाही. निवडणूक आयोगाने असंख्य ईव्हीएम फेरफार आरोपांना उत्तर देताना सांगितले आहे कि, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. ज्यावेळी एखादा व्यक्ती कंट्रोल युनिटवरील मतदारासमोरील बटन प्रेस करतो, त्यावेळी केवळ त्याच दबलेल्या बटणाचा नोंद मशिनकडून घेतली जाते. यादरम्यान युनिटवरील इतर सारी बटणे आपोआप बंद होतात. म्हणजेच एका वेळी फक्त एकच आणि पहिल्यांदाच दाबलेल्या बटनाची नोंद ईव्हीएमकडून घेतली जाते. तसेच यावेळी ईव्हीएम हे कोणत्याही वायफाय,मोबाईल नेटवर्क सारख्या वायरलेस नेटवर्कशी जोडलेले नसते. यामुळे बाहेरून ईव्हीएम हॅक करून बोगस मतदान करणे केवळ अशक्य असल्याचे माहिती निवडणूक आयोगाने वारंवार दिली आहे.

तंत्रज्ञांचे काय म्हणणे आहे?
ईव्हीएम मशीन हि कोणत्याही वायरलेस नेटवर्कशी जोडली गेलेली नसल्याने ऑनलाईन पद्धतीने हॅक करणे शक्य नसल्याचे तंत्रज्ञांचे ही मत आहे. परंतु ते ईव्हीएमला पूर्णपणे सुरक्षित मानत नाहीत. ईव्हीएममध्ये फेरफार करायचा असल्यास मूळ एव्हीएमच्या मशीनमध्येच फेरफार करावा लागेल. मशीनमधील चिपसेटमध्ये फेरफार केल्यास ईव्हीएम हॅक करणे शक्य असल्याचे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. आणि असे करायचे असल्यास ईव्हीएम बनवणाऱ्या संस्था, मशीनमधील चिपसेट बनवणाऱ्या संस्था यांच्या सहभागाशिवाय हे शक्य होणार नाही. आणि खरा संशय ह्या बाबतीतच आहे.

 

ईव्हीएम सुरक्षित कि असुरक्षित?
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाआधी वाराणसीतील काही ईव्हीएम मशीनची स्थानिक उमेदवारांना न कळवता वाहतूक होत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला होता. अशा गोष्टी नवीन नाहीत. प्रत्येक निवडुकीच्या दरम्यान अनोळखी गाड्यांमध्ये सापडणाऱ्या ईव्हीएम मशीन, कचऱ्याचा ढिगाऱ्यांमध्ये आढळणाऱ्या व्हीव्हीपॅटच्या पावत्या अशा घटनांचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. एकीकडे वाराणसीतील घटनेच्या बाबतीत जिल्हा मॅजिस्ट्रेट कुशल राज शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते कि, ईव्हीएमची अवैध वाहतूक होत असल्याची बातमी खोटी आहे. ट्रकमधून इव्हीएमची वाहतूक झाली होती, पण ते नागरिकांना ट्रेंनिंग देण्यासाठी बनवलेल्या डेमो ईव्हीएम मशीन होत्या. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून या विभातील तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. जर डेमो इव्हीएमची वाहतूक कायदेशीर होती, तर अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे काय कारण होते, असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे.

 

हे आपण वाचलंत का?

 

ईव्हीएमचा मतदानासाठी नियमित वापर होण्यास सुरुवात झाल्यापासून वीस वर्ष ओलांडून गेली आहेत. या दरम्यान अनेक राजकीय पक्षांमध्ये अनेक सत्तांतरण झालीत. आज सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधी पक्ष ईव्हीएम हॅक करून निवडणूक जिंकत असल्याचे आरोप करीत आहेत. २००९ साली विरोधी पक्षात असलेली भाजप त्याकाळी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर ईव्हीएम हॅक करत असल्याचे आरोप करत होती. सत्तेत असताना ईव्हीएमच्या सुरक्षेच्या प्रश्नावर शांत राहणे आणि सत्ता गेल्यावर ईव्हीएमचा मुद्द्यावर आवाज उठवणे अशी दुट्टप्पी भूमिका जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील ईव्हीएमबद्दलचे प्रश्न असेच अनुत्तरित राहणार आहेत.

देश- विदेशातील बातम्यांच्या जलद अपडेटसाठी आताच मीडियावार्ताला इंस्टाग्रामवर फॉलो करा.