: मी देव पहिला :

: मी देव पहिला :

: मी देव पहिला :

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

“खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल.”

एका भयाण रात्री “मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण मग्न होता वाचनात.

दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.

रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो. तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस.

सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.

बाळ तू मला बघून का गोड हसलास ?

सर तुम्ही देव आहात !

नाही रे!

सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.

ते जाऊदे तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.

सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होतं. तो ( देव ) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो , तो काहींना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं….तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !

मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला , सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.
सर , माझी आई सांगते , ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा कॉलेज बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला. या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ? असे ना ना प्रश्न आभासून उभे राहिले.

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला , सर ….

अरे तू इथे काय करतोस ?
सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जी वंत माणसं यायची आणि इथे मेलेली. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो. सर मी हार नाही मानली. आई सांगायची……..ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.

बरं….. तुझी आई कुठे आहे ?
सर ती कोरोनाच्या आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. 14 दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.

सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून. कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.

असो सर , तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? सर , तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.

त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.चिमूटभर माझ्या हातावर ठेवली . सर तोंड गोड करा.

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

सर, मला माहीत होते , देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकविला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो……न सांगता.

खरा देव तर कधीच नाही दिसला पण, मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. …. देव पाहिला….

धन्यवाद

लिहता लिहता डोळ्यात पाणी आलं.. म्हणून मी शेअर करतोय….. आवडल्यावर नक्कीच पुढे चालना द्यायची हिच नम्र विनंती.
कारण मलाही कळले माणसातच देव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here