डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही

300

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही

 

प्रणय सोहमप्रभा
मो .नं. – ७०२०९५९४७२

नागपूर: लोकशाहीबाबत “लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही” अशी अब्राहम लिंकन यांनी केलेली व्याख्या सर्वज्ञात आहे . बाबासाहेबांची व्याख्या यावर समाधानी होणारी नाही. मूलभूत विचार करता त्यांची व्याख्या संपूर्ण मानवी विकासाच्या ध्येयाला कवेत घेणारी दिसून येते. २२ डिसेंबर १९५२ रोजी पुणे येथे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या दिली ,”रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात” . म्हणजेच बाबासाहेब केवळ लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सत्तेवर येण्याच्या पलीकडे जाऊन करणे असलेल्या कृतीकार्यक्रम स्पष्ट करण्याच्या दिशेने विधान करतात.बाबासाहेबांच्या विचारात उदारमतवादी लोकशाही दिसून येते .त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्य ,समता, बंधुता ही मुल्य त्यांनी सर्वकष समाज क्रांतीची व नवसमाज निर्मितीची मूलप्रेरणा मानली .जीवनविषयक आदर्श तत्वप्रणाली म्हणूनही डॉ.बाबासाहेब उदारमतवादी लोकशाहीचे स्वीकार व समर्थन करतात.बाबासाहेबांनी भारतीय समाजाच्या संदर्भात उदारमतवादी लोकशाहीच्या विचारला व्यापक परिवर्तनशीलतेचे व समाजभिमुखतेचे प्रवाही परिणाम दिले .संसदीय लोकशाही ,घटनात्मक मार्ग व नितीमत्ता ,स्वतंत्र न्यायव्यवस्था आदींचा विचार व संख्यात्मक संकल्पनांचा त्यांनी पुढाकार केला .सामाजवादातील आर्थिक समतेची व न्यायाची प्रेरणा आणि नियोजनाची आवश्यकता त्यांनी स्वीकारली होती.तरीपण राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून ही प्रेरणा कार्यशील केली पाहिजे ,असे त्यांचे स्पष्ट मत होते . बाबासाहेबांच्या मते “भारतीय समाजात जातिव्यवस्थेचे निर्मूलनसारख्या पायाभूत सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिल्याखेरीज राजकीय व आर्थिक सुधारणा प्रभावी व अर्थपूर्ण ठरणार नाही .त्यांनी भारतातील सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात उदारमतवादी विचारला त्यांच्या सामर्थ्याचे व मर्यादांचे भान ठेऊन नवा आशय व दिशा दिली ,स्वातंत्र्य-समता-बंधुता या उदारमतवादाच्या पायाभूत मूल्यविचारांचा विकास बाबासाहेबांच्या राजकीय विचारातच नव्हे तर एकूण विचार विश्वातच दिसून येतो. ” व्यक्तीचे हक्क वा स्वातंत्र्य हे व्याक्तीविकासाचे व व्यक्तीप्रतीभेचे महत्वाचे साधन आहे हे त्यांना मान्य होते. तसेच त्यांनी हे पूर्णतः ओळखले होते की सामाजिक शक्तीकडून,संस्थाकडून अन्याय ,शोषण वा दडपणूक होऊ शकते आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्य ,हक्क ,विकास व प्रतिष्टा यांना बाधा येऊ शकते .स्वातंत्र्य – समता – बंधुता या दिशेने होणारे सामाजिक परिवर्तन हेच व्यक्ती स्वातंत्र्य ,विकास व प्रतिष्ठा यांना संरक्षण देते .परिवर्तनाच्या या सामाजिक प्रेरणांना डॉ .बाबासाहेबांनी आपल्या विचारात प्राधान्य दिले.यामुळेच हे परिवर्तन पुरोगामी ,विवेकनिष्ठ व सुव्यवस्थितरित्या उत्क्रांत होत असते अशी बाबासाहेबांची उदारमतवादाची धारणा होती .बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांची चिकित्सा करतांना एक गोष्ट लक्षात येते की,उदारमतवादातील राजकीय विचार व सामाजवादातील आर्थिक समतेचा ,सामाजिक न्यायाचा विचार यांचा समन्वय घडवून आणला पाहिजे ,लोकशाहीच्या मार्गाने समाजवाद प्रत्यक्षात आणला पाहिजे ,ही लोकशाही समाजवादाची संकल्पांना त्यांची होती .

सामाजिक लोकशाहीचा भाग म्हणून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची संकल्पना मांडली.सामाजिक लोकशाहीशिवाय संसदीय लोकशाही यशस्वी होत नाही ,असे त्यांचे स्पष्ट मत होते. डॉ .बाबासाहेबांच्या मते,सामाजिक लोकशाही यशस्वी करायची असेल तर सामाजिक न्यायाची जोड असणे आवश्यक आहे .सामाजिक न्यायाशिवाय सामाजिक लोकशाही परिपूर्ण होऊ शकत नाही .संविधान सभेच्या आपल्या भाषणात याचे महत्व सांगितले.स्वातंत्र्य हे समतेपासून वेगळे करता येणार नाही .समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही .स्वातंत्र्य आणि समता यांचा बंधुतापासून विच्छेद संभवत नाही.समतेशिवाय स्वातंत्र्य हे मूठभरांच्या वर्चस्वास जन्म देईल . स्वातंत्र्याशिवाय समता ही व्यक्तिगत उपक्रमशीलतेस मारक ठरेल.बंधुतावाचून स्वातंत्र्य आणि समतेचा उगमच संभवत नाही.भारतीय समाजात आपल्याला दोन गोष्टीचा अभाव दिसून येतो तो म्हणजे समता ,सामाजिक दृष्टीने भारतातील समाज हा श्रेणीयुक्त विषमतेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे ,तसेच बहुसंख्य लोक अठरा विश्व दारिद्र्यात राहतात .आपण आपल्या सामाजिक जीवनात जर समता नाकारली तर राजकीय लोकशाहीचे नष्टचर्य ओढवेल .ती त्वरित दूर केली पाहिजे .अन्यथा ,अत्यंत मेहनतीने घडविलेला लोकशाहीचा इमला ,विषमतेने ग्रस्त आणि त्रस्त असलेले लोक उद्धवस्त करून टाकतील.

राजकीय लोकशाही प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तिला आर्थिक लोकशाहीची जोड असलीच पाहिजे .यासाठी बाबासाहेब आग्रही होते.आर्थिक क्षेत्रात शासन संस्थेचे हस्तक्षेपाचे समर्थन केले कारण त्यांचे असे मत होते की जर शासनसंस्थेच्या हस्तक्षेपाचवाचून स्वातंत्र्य हे खाजगी मालकांच्या हुकुमशाहीचे दुसरे नाव आहे .सरंजामी व भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा परिवर्तनाचा मार्ग म्हणून बाबासाहेबांनी समाजवादाचा पुरस्कार केला.बदलत्या संसदेकडून बाधा येऊ नये म्हणून त्यांनी या समाजवादी आर्थिक कार्यक्रमाला घटनात्मक पाया दिला अन्यथा हुकुमशाहीखेरीज दुसरा पर्याय उरणार नाही .

कायदा आणि प्रशासनात समान संधी असणे लोकशाहीस पोषक असते असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणजेच उच्चवर्गीयांना व खालच्या घटकाला समान न्याय मिळावा असे त्यांना अभिप्रेत होते . न्याय विकत घेता येऊ नये , तो नैतिकतेच्या कसोटीवर घेतला जावा , सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या हातातले शस्त्र म्हणून त्याचा वापर न करता ते सर्वसामान्यांच्या न्यायासाठीचे व्यासपीठ असावे .

लोकशाही यशस्वी होण्याकरता संविधानिक जागरूकता, लोकनिष्ठा , संविधानिक नैतिकता,सक्षम विरोधी पक्षाचे अस्तिव (जे आज आपल्याला दिसत नाही )असणे अपरिहार्य असल्याचे बाबासाहेब सांगतात. आपण यावेळी निवडून आलेलो असल्याने येणार्‍या काळात आपण दुसऱ्यांदा कोणा दुसर्‍याला संधी देण्याची मागणी संविधानिक नैतिकता करते . या संदर्भात बाबासाहेब अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टनचे उदाहरण देखील देतात . कुठल्याही समूहासोबत , वर्गासोबत , कसाही होत असलेल्या अन्यायाविरोधात सर्व देशाने एकत्रित येण्याची लोकनिष्ठा लोकशाहीला समाधानी करणार असल्याचे बाबासाहेब सांगतात . त्याविरोधात सर्वांनी मिळून लढा उभारण्याची जबाबदारी लोकशाही नागरिकांवर देते .

वाढती सामाजिक विषमता , संपत्तीच्या केंद्रीकरणाने वाढत असलेले आर्थिक विषमतेची दरी , उच्चवर्गीयांच्या आजारी दृष्टिकोनाला भेटत असलेले पोषक वातावरण , भरपूर पैसा असलेल्यांचे वर्चस्व असल्याने दूषित झालेली राजकीय स्पर्धा , सत्ताधाऱ्यांचे न्यायव्यवस्थेपेक्षा वाढलेले स्थान , प्रस्थापित वर्गाने त्यांच्या फायद्यासाठी जपलेले सर्व क्षेत्रातील त्यांचे हितसंबंध , विशिष्ट पक्ष मुक्त भारत करण्याची सत्ताधाऱ्यांनी राबवलेली योजना , विषमतावादी अन्यायाला न्याय मानण्याची वाढलेली वृत्ती , विकले गेलेले पत्रकार व प्रशासकीय अधिकारी व फक्त जनतेच्या सत्ताधारी पक्षविरोधी भावनेवर स्वार होऊन सत्तेत येण्याची विरोधी पक्षाची प्रक्रिया भारतात लोकशाही फक्त नावापुरताच असल्याचे स्पष्ट करते . बाबासाहेबांना कल्याणकारी वाटणारी व सामाजिक सुधारणेचे माध्यम म्हणून अभिप्रेत असलेली व्यवस्था फक्त नावापुरती ठेवण्यासाठी आपण जणू एखादा उपक्रमच राबवत आहोत या दृष्टिकोनातून याकडे बघता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ वी जयंतीनिमित्त त्यांच्या लोकशाही विषयक विचारांवर चर्चा करून ती यशस्वी होण्याकरता छोटासा संकल्प करणेच त्यांना खरी मानवंदना देण्यासारखे आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!