भारतातील फक्त बारा ठिकाणांना पुष्कर कुंभमेळ्याचा अलभ्य लाभ प्राप्त झाला आहे. त्यात महाराष्ट्राच्याही गळ्यात वैभवशाली अस्मितेची एक पुष्पमाळा सिरोंचाच्या रूपाने पडली. हे काय थोडे थोडके झाले? महाराष्ट्रातील महा महा जिल्हे, महा महा ठिकाण यांना या अमृतकुंभाचा लाभ झाला नाही. अतिदुर्गम व मागास तालुका सिरोंचासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकडे कुत्सित, संकुचित व तिरसट नजरेने पाहिले जाते का? म्हणूनच तो विकासापासून कोसो दूर आहे…

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे
गडचिरोली,
मोबा. ७७७५०४१०८६.

गडचिरोली: भारतातील फक्त बारा ठिकाणांना पुष्कर कुंभमेळ्याचा अलभ्य लाभ प्राप्त झाला आहे. त्यात महाराष्ट्राच्याही गळ्यात वैभवशाली अस्मितेची एक पुष्पमाळा सिरोंचाच्या रूपाने पडली. हे काय थोडे थोडके झाले? महाराष्ट्रातील महा महा जिल्हे, महा महा ठिकाण यांना या अमृतकुंभाचा लाभ झाला नाही. अतिदुर्गम व मागास तालुका सिरोंचासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकडे कुत्सित, संकुचित व तिरसट नजरेने पाहिले जाते का? म्हणूनच तो विकासापासून कोसो दूर आहे. या पुष्करविषयी वाचा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा ज्ञानवर्धक लेख… संपादक.

यंदा महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर पुष्कर कुंभमेळा सुरू झाला आहे. तो दर १२ वर्षांनी नित्यनेमाने येतो. यंदा हा पुष्कर मेळावा नुकताच दि.१३ एप्रिल २०२२पासून सुरू झाला; तो तब्बल बारा दिवस म्हणजेच दि.२४ एप्रिल २०२२ पर्यंत चालणार आहे. प्राणहिता नदीच्या सिरोंचा येथील नदी घाटावर भरणाऱ्या या कुंभमेळ्यात तेलंगणा, छत्तीसगड सह महाराष्ट्रातील लाखो श्रद्धाळू, भाविक, भक्तगण पवित्र स्नानासाठी येतात. जवळच्या कालेश्वरम येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अडचण भाविकांना येऊ नये, म्हणून प्रशासन यंत्रणा सजगपणे कार्यरत आहे. सोबतच जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागतही करीत आहे. पुष्कर कुंभमेळ्यास भाविक, भक्तगण येऊ इच्छिता ना? तर अवश्यच या.

सिरोंचा हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील तालुका मुख्यालय आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर कालेश्वरम मंदिराजवळ गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या संगमाजवळ शहर वसलेले आहे. सिरोंचा येथे येण्यासाठी नागपूरहून गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही मार्गे पक्का रस्ता आहे. नागपूर ते गडचिरोली १७१ किमी आहे, तर नागपूर ते चंद्रपूर १५३ किमी इतके अंतर आहे. सिरोंचा हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २०५ किमी अंतरावर आहे; तर चंद्रपूर ते गोंडपिंपरी मार्गे २०९ किमी अंतरावर आहे. सिरोंचासाठी जवळचे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील चंद्रपूर व नागपूर हे आहेत आणि जवळचे विमानतळ नागपूर आहे. तसेच सिरोंचाहून हैद्राबाद फक्त २७३ किमी एवढ्याच दूर आहे. सिरोंचा हे ठिकाण उन्हाळ्यात काही प्रमाणात उष्ण असते. त्यामुळे पुष्कर कुंभमेळ्यादरम्यान उन्हापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक साहित्य सोबत असणे भाविकांसाठी गरजेचे आहे.

पुष्कर या शब्दाला धार्मिक, पौराणिक आणि भौगोलिक अधिष्ठान व महत्त्वही आहे. पुष्कर हा नद्यांच्या पूजेला समर्पित असा भारतीय सण सुद्धा आहे. याला तेलगू भाषेत पुष्करलू, कन्नडमध्ये पुष्करा आणि मराठी व हिंदीमध्ये पुष्कर असे म्हणतात. भारतातील १२ प्रमुख पवित्र नद्यांच्या काठावर पुष्कर कुंभमेळा चक्रीप्रमाणे आयोजित केला जातो. परत प्रत्येकाचा नंबर लागण्यास बारा वर्षांचा कालावधी लोटत असतो. तेथे नदी घाटावरील देवस्थानांमध्ये पूर्वजांची पूजा, आध्यात्मिक प्रवचन, भक्ती संगीत, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा नाना रूपातून साजरा होत असतो. प्रत्येक नदीकाठी १२ वर्षांत एकदा हा उत्सव दरवर्षी होतो. प्रत्येक नदी एका राशीच्या चिन्हाशी संबंधित आहे आणि प्रत्येक वर्षाच्या उत्सवाची नदी त्या वेळी कोणत्या राशीत बृहस्पती ग्रह आहे, यावर आधारित आहे. प्रादेशिक भिन्नतेमुळे, काही राशिचक्र अनेक नद्यांशी संबंधित आहेत. जातक पारिजात-१४२६ सारख्या ज्योतिषशास्त्र ग्रंथात नमूद केलेल्या आख्यायिकेनुसार कठोर तपश्चर्येनंतर एका पुजाऱ्याला शिवाकडून वरदान मिळाले, की तो पाण्यात राहून पवित्र नद्या शुद्ध करू शकेल. तो पुढे पुष्करा- जो पोषण करतो म्हणून ओळखला जाऊ लागला. बृहस्पतीच्या विनंतीवरून जेव्हा बृहस्पती एका राशीतून दुसऱ्या राशीत गेला तेव्हा त्याने १२ पवित्र नद्यांपैकी एकात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नदी एका राशीशी निगडीत असते आणि प्रत्येक वर्षाच्या सणाची नदी त्या वेळी गुरुग्रह- बृहस्पती कोणत्या राशीत आहे, यावर आधारित असते. असे काही कालखंड असतात जेव्हा गुरु प्रतिगामी गतीमध्ये असतो, परिणामी वर्षातून दोनदा एकाच राशीत प्रवेश होतो. अशा प्रसंगी, बृहस्पतिचा दुसरा प्रवेश उत्सवाचा पहिला भाग साजरा करण्यासाठी गणला जातो. प्राणहिता पुष्कर हा प्राणहिता नदीचा उत्सव आहे, जो साधारणपणे १२ वर्षातून एकदा येतो. बृहस्पती मीन राशीत प्रवेश केल्यापासून बारा दिवसांच्या कालावधीसाठी पुष्कर पाळला जातो. म्हणून कुंभमेळाही बारा दिवस भरतो. या पावन १२ नद्यामध्ये गंगा- गंगोत्री, हरीद्वार, वाराणसीसह सहासात नद्यांचे घाट, नर्मदा- ओंकारेश्वर, सरस्वती- प्रयाग, यमुना- मथुरा, गोदावरी- कोटीलींगला, कालेश्वरम, कृष्णा- विजयवाडासह दक्षिण भागात, कावेरी- कर्नाटक, भीमा- कर्नाटक व तेलंगणा, तापी- ब्रह्मपुत्रा नदी आसाम, तुंगभद्रा- तेलंगणा व आन्ध्र प्रदेश, सिंधू- लद्दाख व लेह आणि प्राणहिता- सिरोंचा महाराष्ट्र या नद्यांवर दरवर्षी एका ठिकाणी पुष्कर भरत असतो. पुष्कर म्हणजे निळे कमळ असा अर्थ होतो. पुष्करचे मुख्य आकर्षण पुष्कर तलाव आहे जो तिबेटचे मानसरोवर तलावासारखा पवित्र मानला जातो. या पवित्र तलावामुळे पुष्कर हिंदू तीर्थक्षेत्राचे स्थान बनले आहे. कल्पित गोष्ट अशी आहे की हा तलाव भगवान ब्रह्मदेवाला अर्पण करणारा होता, जेव्हा कमल हातातून पडले त्या ठिकाणी एक तलाव उदयास आले.

 

हे लोकप्रिय लेख आपण वाचलेत का?

 

पुष्कर नावाच्या शहरातील अजमेर हे जवळचे पर्यटन आकर्षण आहे. अजमेरपासून २७ किमी अंतरावर स्थित किशनगढ आहे, जो लघुचित्र-चित्रपट यासाठी प्रसिद्ध आहे. अधिक लोकप्रियपणे बानी थानी म्हणून ओळखले जाते. जुन्या पुष्कर तलावाची पुनर्बांधणी ही पुष्कर तलावापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. प्राचीन ग्रंथांच्या अनुसार जुन्या पुष्करचे यात्रेकरूंसाठी समान सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

सिरोंचा शहरालगत प्राणहिता नदीवर स्नान करण्यास नदीचे दोन घाट प्रतीक्षारत आहेत. एक विठ्ठलेश्वर मंदिराजवळ तर दुसरा नगरमजवळ अगदी सुसज्ज आहे. या दोन्ही ठिकाणी पुष्कर दरम्यान येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उपाययोजना राबविल्या जात आहेत. यात विठ्ठलेश्वर मंदिराजवळील घाट, नगरम, पोलीस चौकी, कंट्रोल रूम तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे विध्वंसक कृत्य घडू नयेत, म्हणून बारीक नजर ठेवून आहेत. पुष्कर बाबत सनियंत्रणासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसाठी पेंडाल व टेंट उभारले आहेत. तसेच सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. विविध सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकर व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपत्ती विभागाकडून स्नानावेळी बचाव पथके उभी केली जात आहेत. पोहणारे व प्रशिक्षित मनुष्यबळ अनुचित प्रकारांवर आळा घालतं आहेत. यावेळी विविध आपत्ती व्यवस्थापन वाहने तसेच इलेक्ट्रीक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वागत कक्षाची उभारणी केली आहे. दोन्ही ठिकाणी शुद्ध पाणी व्यवस्था तसेच हातपंप, विंधन विहीरीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. विविध गर्दीच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवरती आवश्यक माहिती सतत भविकांना दिली जात आहे. शौचालय व्यवस्थेसह आंघोळीस स्नानगृह आणि कपडे बदलण्यास बंद खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. नदी घाटावर जाण्यास पक्का रस्ता आहे. सर्व रस्त्यांवरील पथदिवे व हायमास्ट लाईटस उभारण्यात आले आहेत. प्रशासनाच्या व आरोग्य सुविधांच्या कामासाठी जागोजागी बरेच तंबू लावलेले आहेत. कोविडबाबत विविध मेडिकल साहित्यासह इतर आजारांची औषधेही उपलब्ध आहेत. स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ, कचरागाडीसह व्यवस्था करण्यात आली आहे.

मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी तीन महीन्यांपासूनच भाविकांसाठी नदीघाटावरील जागा स्वच्छ करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्यात आले. पाणी व दिवाबत्ती व्यवस्था केली आहे. तसेच इतर आवश्यक मदत सज्ज आहे. याकामी स्थानिक तालुका व जिल्हा प्रशासनाने तेलंगणा प्रशासनाशी समन्वय साधून आकर्षक नियोजन केले. मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधून भाविकांचा येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करणे याबाबतही नियोजन केले गेले. यापुर्वी सन २०१० साली झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सिरोंचा येथे पुल नव्हता. आता येण्याजाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याने सिरोंचाकडे जास्त भाविक भक्तांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. साधारणपणे लाखो भाविकांच्या हिशेबाने सदर मेळाव्याचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे. यात नेहमीप्रमाणे तेलंगणा राज्य प्रशासनाचीही प्रशंसनीय मदत व सहकार्य मिळत आहे. पुष्कर यात्रा ही दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी तंबाखूमुक्त जत्रा, कायदा माहितीचे फलक अनेक ठीकाणे लावले आहेत. कुंभमेळा परिसरात पोलिस विभागाचे स्वतंत्र फिरते पथक कार्यरत आहे. या पथकाची शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर करडी नजर आहे. जत्रा परिसरात खर्रा, तंबाखू, मादक पदार्थ विक्रीस मज्जाव आहे. या पावन जत्रेच्या ठिकाणाचे पावित्र्य अबाधित राहील, असे वर्तन यात्रेकरूकडून झाले पाहिजे. तेथे ओली पार्टी, सुखी पार्टी, कोबंड्यांच्या झुंजी, जुगार, सट्टा, अश्लील चाळे, देहविक्रय, नदीपात्रात कोठेही मलमूत्र विसर्जन, पाण्यात कचरा व निर्माल्य विसर्जन करणे अगत्यानेच टाळले पाहिजे. कारण हा कुंभमेळा म्हणजे वरील कथेत वर्णील्याप्रमाणे नदीच्या स्वच्छतेसाठी घेतलेला वसा व वरदान आहे, मग स्वच्छता नको का पाळायला? असे आढळल्यास पोलिस विभाग कठोर कारवाईच्या हेतूने टपून आहे. यात्रेकरूंनी सावधपणे व सज्जन वृत्तीने वागलेलेच बरे!

भारतातील फक्त बारा ठिकाणांना पुष्कर कुंभमेळ्याचा अलभ्य लाभ प्राप्त झाला आहे. त्यात महाराष्ट्राच्याही गळ्यात वैभवशाली अस्मितेची एक पुष्पमाळा सिरोंचाच्या रूपाने पडली. हे काय थोडे थोडके झाले? महाराष्ट्रातील महा महा जिल्हे, महा महा ठिकाण यांना या अमृतकुंभाचा लाभ झाला नाही. अतिदुर्गम व मागास तालुका सिरोंचासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकडे कुत्सित, संकुचित व तिरसट नजरेने पाहिले जाते. म्हणूनच तो विकासापासून कोसो दूर आहे. एवढा मोठा कीर्तिमान व बहुमान प्राप्त कुंभमेळा! मात्र याकडे लक्ष तथा आर्थिक मदतीचा हात फक्त जिल्ह्याचे पालकमंत्रीच देतात. राज्यातील मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्रीमंडळास हा सर्गमय नजारा व ते अहोभाग्य सिरोंचास मिळावयास नको होते, असे वाटत असावे की काय? यापुढे तरी महाराष्ट्र शासनाने या पावन स्थळाच्या विकासाकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे, हीच रास्त अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here