मुंबई : मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या १५व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले. त्याचवेळी, भारतीय गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी पुरुषांमध्ये, तर महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग आणि महाराष्ट्राच्या ज्योती गवते यांनी अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
रविवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु झालेल्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये यंदा वातावरणाचा मोठा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला. विशेष म्हणजे विदेशी धावपटूंसह भारतीय धावपटूंनाही उष्ण वातावरणाचा त्रास झाल्याने कामगिरीवर परिणाम झाल्याची प्रतिक्रीया सर्वच धावपटूंनी दिली. मुख्य मॅरेथॉन एलिट गटातील प्रमुख चार खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीनुसार यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये नवा विक्रम नोंदवला जाईल, अशी खात्री बाळगण्यात आली होती. मात्र, उष्ण हवामानामुळे निर्धारीत वेग कायम राखण्यात धावपटू अपयशी ठरले.
मुंबई मॅरेथॉनमध्ये २०१६ साली केनियाच्या गिदोन कीपकिटर याने २ तास ८ मिनिटे ३५ सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. यंदाच्या स्पर्धेतील प्रमुख चार खेळाडूंची सर्वोत्तम वेळ प्रत्येकी २ तास ६ मिनिटांची होती. परंतु, हवामानाचा फटका बसल्याने कीपकिटरचा विक्रम कायम राहिला. यंदाच्या सत्राचे जेतेपद पटकावलेल्या इथियोपियाच्या सोलोमोन डेक्सिसा याने २ तास ९ मिनिटे ३४ सेकंदाची वेळ देत बाजी मारली. त्याचवेळी, सुमेत अकालनौ (इथियोपिया, २:१०:१०) आणि जोशुआ किपकोरिर (केनिया, २:१०:३०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले.
सोलोमोन याने सुरुवातीपासून आघाडी घेत २० किमी अंतरापर्यंत आघाडी कायम राखली होती, मात्र, यानंतर केनियाच्या किपकोरिर याने आघाडी घेतली. २५ किमी अंतरानंतर पुन्हा एकदा सोलोमोन याने आघाडी घेत अखेरपर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी धावपटूंना मागे ठेवत बाजी मारली. दुस-या स्थानासाठी किप्कोरिर याने अकलनौ याला कडवी टक्कर दिली. मात्र अखेरच्या ५०० मीटर अंतरामध्ये अकलनौ याने कमालीचा वेग वाढवत रौप्य पटकवाताना किपकोरिर याला कांस्य पदकावर भाग पाडण्यास पाडले.
महिलांमध्ये इथियोपियाच्याच अमाने गोबेना हिने २ तास २५ मिनिटे ४० सेकंदाची विजयी वेळ नोंदवताना गतविजेत्या केनियाच्या बोर्नेस कितूर (२:२८:४८) हिला रौप्य पदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. इथियोपियाच्याच शुको गेनेमो (२:२९:४१) हिने कांस्य पदकावर नाव कोरले. पुरुष व महिला गटातील विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी ४२ हजार डॉलरच्या रोख रक्कमेने गौरविण्यात आले.

भारतीय धावपटूंच्या पुरुष गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी अपेक्षित कामगिरी करताना एकहाती वर्चस्व राखले. गोपी थोनाकल, नितेंदर सिंग रावत या आॅलिम्पियन धावपटूंसह सेनादलच्याच श्रीनू बुगाथा यांनी अव्वल तीन स्थान पटकावताना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. यामध्ये श्रीनूने पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना आपल्या पहिल्याच प्रयत्नात पोडियम स्थान पटकावले. मात्र तरीही याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, अशी खंत त्याने व्यक्त केली.
गोपीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारताना २ तास १६ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत वर्चस्व राखले. नितेंदर आणि श्रीनू यांनी अनुक्रमे २ तास १६ मिनिटे ५४ सेकंद आणि २ तास २३ मिनिटे ५६ सेकंद अशी वेळ नोंदवली. गोपीने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. नितेंदरने त्याला गाठण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु गोपीच्या सातत्यपूर्ण वेगापुढे त्याला अव्वल स्थान पटकावण्यात यश आले नाही.
महिलांमध्ये ओलिम्पियन सुधा सिंगने निर्विवाद वर्चस्व राखताना २ तास ४८ मिनिटे ३२ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. सुधाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पणास लावताना गतविजेती महाराष्ट्राची धावपटू ज्योती गवते हिचे आव्हान मागे टाकले. ज्योतीला २ तास ५० मिनिटे ४७ सेकंद अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच, पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या रेल्वेच्या पारुल चौधरीने २ तास ५३ मिनिटे २६ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here