नवी मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा वादग्रस्त ठरलेला स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा शुक्रवारी अखेर महासभेत मंजूर करण्यात आला. या वेळी चौगुले हे अनुपस्थित होते; मात्र चौगुलेसमर्थक नगरसेवक बहादूर बिस्ट, गवते व मनोज हळदणकर यांनी अशा प्रकारे राजीनामा मंजूर होऊ शकत नसल्याचे सांगत आक्षेप घेतला.
महापौर जयवंत सुतार यांनी विषय पत्रिकेवरील विजय चौगुले यांच्या स्थायी समिती सदस्यपदाच्या राजीनाम्याचा विषय पुकारताच शिवसेनेचे नगरसेवक बहादुर बिस्ट, जगदीश गवते व मनोज हळदणकर यांनी राजीनामा पत्राला आक्षेप घेतला. या प्रकरणी चौगुले यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून राजीनामा पत्रावरील सही स्वत:ची नसल्याचा दावा केला आहे. तसेच या पत्रावर जावक क्रमांकदेखील नाही. यासाठी खोटय़ा लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हळदणकर यांनी केली. त्यावर जयवंत सुतार यांनी चौगुले यांनी राजीनामा पत्रावर घेतलेल्या आक्षेपात सही खोटी असल्याचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चौगुले यांच्याकडून महापौर कार्यालयात आलेल्या अनेक पत्रांना जावक क्रमांक नसल्याचे सांगत विरोधकांचा मुद्दा खोडून काढला.
याबाबत सचिवांनी लेखी खुलासा दिला आहे. आयुक्तांनीही याबाबत अहवाल मागितला आहे, असे सुतार यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांचे समाधान न झाल्याने चौगुले यांनी सचिव विभागाकडे केलेला पत्रव्यवहार वाचून दाखविण्यात आला. यामध्ये चौगुले यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे नमूद करून त्या जागेवर कोणाचीही नेमणूक करू नये किंवा त्या संबंधित कोणतीही कार्यवाही करू नये, असे म्हटले आहे. तसेच या तथाकथित राजीनाम्याची माहिती मिळावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.